
विभागीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड
रत्नागिरी, दि. १२ ):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्यावतीने एस. व्ही. जे. टी. क्रीडा संकुल देवरुख येथे नुकत्याच जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांमध्ये जिल्हा क्रीडा जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षण केंद्रातील दोन खेळाडूंनी १४ व १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात सहभाग घेतला.
या स्पर्धांमध्ये यश अनंत गाबनंग याने १७ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला, तर उत्कृष्ट अनिल खापरे याने १४ वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक मिळविला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी प्रशिक्षक सचिन मांडवकर यांनी सांभाळली. या स्पर्धेत रत्नागिरी, चिपळूण व संगमेश्वर या तालुक्यातील पोदार इंटरनॅशनल स्कूल, पी. एस. बी. इंटरनॅशनल स्कूल संगमेश्वर, श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट इंग्लिश मीडियम स्कूल डेरवण, सर्वंकष विद्यामंदिर व खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल गोवळकोट या शाळांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी विनोद राऊत, मंगेश जाधव, प्रसन्नजित कांबळे यांसह अनेक क्रीडा शिक्षक उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी दोन्हीही खेळाडूंचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले. भविष्यात त्यांनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये जिल्हा, राज्य तसेच देशाचे प्रतिनिधित्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पुढील विभागीय शालेय जिम्नॅस्टिक्स क्रीडा स्पर्धेकरिता खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.