कविकुलगुरू कालिदास हे साहित्य क्षेत्राचे ‘मेरूमणी’ रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांचे गौरवोद्गार.

संस्कृत भाषा व संस्कृत साहित्य यांची व्याप्ती मोठी आहे. मात्र संस्कृत क्षेत्रातील अग्रणी साहित्यिक व महाकवी कालिदास यांनी स्वत:च्या प्रतिभेच्या जोरावर वाचकांच्या मनावर मोहिनी घातली. त्यामुळेच आजच्या आधुनिक काळात देखील महाकवी कालिदास यांच्या साहित्याचा संस्कृतप्रेमी आणि साहित्याचे वाचक आस्वाद घेत आहेत. कारण कविकुलगुरू कालिदास साहित्य क्षेत्राचे मेरूमणी आहेत असे गौरवोद्गार भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी काढले. ते रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र येथे महाकवी कालिदास दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी संचालक डॉ. दिनकर मराठे म्हणाले की आजचा दिवस खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. संस्कृत कवींमध्ये महाकवी कसलिदास सर्व श्रेष्ठ आहेत आणि विश्वविद्यालयाचे नाव देखील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय आहे. त्यातही महत्वाचे म्हणजे विश्वविद्यालय हे नागपूर मधील रामगिरी पर्वताच्या पायथ्याला असणाऱ्या रामटेक परिसरात आहे. याच रामगिरी पर्वतावर महाकवी कालिदास यांनी अजरामर खंडकाव्य मेघदूत रचले. महाकवी कालिदास यांच्या लेखनप्रतिभेबाबत आणि विद्वत्तेबाबत बोलताना संचालक डॉ. दिनकर मराठे म्हणाले की पुरा कवीनां गणना प्रसंगे.. या संस्कृत भाषेतील प्रसिद्ध उक्तीनुसार कोणे एके काळात संस्कृत कवींमध्ये श्रेष्ठ कोण असा प्रश्न विद्वानांनी उपस्थित केला होता तेव्हा हाताच्या बोटांवरून गणना सुरू झाली यावेळी कनिष्ठिका बोटावर कालिदास यांचे नाव गणले गेले मात्र अनामिकेठी कालिदासापेक्षाउत्तम कोणताच कवि सापडला नाही. अनामिकेचा नावरहित असा अर्थ यानिमित्ताने सार्थ झाला. महाकवी कालिदास हे उपमा अलंकारासाठी प्रसिद्ध आहे आणि त्यांच्या ‘मालविकाग्निमित्र’ , ‘अभिज्ञानशाकुन्तलम्’ आणि ‘विक्रमोर्वशीयम् ’ ही तीन नाटके ‘रघुवंश’, ‘कुमारसंभव’ ही दोन महाकाव्ये , आणि ‘मेघदूत’ खंडकाव्य व ‘ऋतुसंहार’ हे निसर्गवर्णनपर काव्य या ७ साहित्यकृती प्रसिद्ध असून आजही या ७ साहित्यकृतींवर सतत अभ्यास व संशोधन सुरू आहे . या कार्यक्रमात महाकवी कालिदास यांच्या अभिज्ञानशाकुन्तलम् आणि मेघदूत या साहित्य कृतीतील निवडक महत्वाच्या श्लोकांचे सामूहिक पठण करण्यात आले व श्लोकांमधील लेखन वैशिष्ट्यांची माहिती उपस्थिताना देण्यात आली. शिवाय महाकवी कालिदास दिनाच्या निमित्ताने एक लघुपट दाखवण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील प्राध्यापक व कर्मचारी वर्ग व विदयार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button