- पुणे शहरात भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि सध्याचे शहराचे महासचिव प्रमोद विठ्ठल कोंढरे यांच्यावर महिला पोलीस अधिकाऱ्याशी विनयभंग आणि गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४ आणि ७५(१) अंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहर पोलीस दलातील एक महिला पोलीस निरीक्षक या प्रकरणाची फिर्यादी असून, त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, भाजप नेते प्रमोद कोंढरे यांनी एकदा नाही, तर दोन वेळा त्यांना अयोग्य आणि अश्लील पद्धतीने स्पर्श केला. या प्रकारामुळे त्यांना अत्यंत अपमानित वाटले. घटनेनंतर त्यांनी तात्काळ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
ही घटना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घडली. दौऱ्याच्या व्यवस्थापनात कार्यरत असताना कोंढरे यांनी पाठीमागून संबंधित महिला अधिकाऱ्याला धक्का दिला होता. हा प्रकार चहाच्या दुकानाजवळ घडला आणि तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.
महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर हे प्रकरण थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तक्रारीसोबत सादर करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करण्यात आली. यानंतर पोलीस आयुक्तांनी प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी अधिकृत एफआयआर नोंदवली असून, सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याशी अशा प्रकारचे वर्तन हा केवळ महिलांचा अपमान नाही, तर पोलीस यंत्रणेचा आणि कायद्याचा अवमान आहे,” असे त्या म्हणाल्या.
या घटनेनंतर समाजात महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Back to top button