
राजापूर तालुक्यातील अणसुरे म्हैसासुरवाडी येथील तरुण मासे पकडताना खाडीत बुडाला.
राजापूर तालुक्यातील अणसुरे म्हैसासुरवाडी येथील एक तरुण मासे पकडताना खाडीत बुडून बेपत्ता झाला होता. दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मंगळवारी (२४ जून २०२५) सायंकाळी त्याचा मृतदेह शेवडीवाडी खाडीकिनारी आढळून आला. नवनाथ महादेव नाचणेकर ( ३१, रा. अणसुरे म्हैसासुरवाडी, ता. राजापूर) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ नाचणेकर हा २४ जून रोजी सकाळी अणसुरे येथील समुद्र खाडीत मासळी पकडण्यासाठी गेला होता. मासळी पकडून तो खाडीतून बाहेर येत असताना अचानक समुद्राला भरती आली. पाण्याचा अंदाज न आल्याने तो खाडीच्या पाण्यात बुडाला आणि दिसेनासा झाला.या घटनेनंतर तात्काळ त्याचा शोध सुरू करण्यात आला, मात्र तो सापडला नाही. त्यामुळे २४ जून रोजी सकाळी १०.२८ वाजता नाटे पोलीस ठाण्यात नवनाथ नाचणेकर बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी खाडीच्या पाण्यात त्याचा शोध सुरू ठेवला होता. अखेर, त्याच दिवशी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास नवनाथचा मृतदेह शेवडीवाडी येथील खाडीकिनारी पाण्यामध्ये मृतावस्थेत आढळून आला