
मुंबईतील एका उद्योजकाने अयोध्येतील राम मंदिराला सुमारे १७५ किलो सोने दान केले
अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण होऊन दीड वर्ष उलटून गेले, तरी भाविकांची राम दर्शनाची आस अद्यापही कमी झालेली नाही. आजही अयोध्येत लाखो भाविक राम मंदिराच्या दर्शनासाठी येत आहेत.सन २०२५ च्या अखेरपर्यंत राम मंदिर परिसरातील सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे. यातच मुंबईतील एका उद्योजकाने महादान केल्याची माहिती मिळाली आहे. या बड्या उद्योजकाने राम मंदिरासाठी तब्बल १७५ किलो सोने अर्पण केले आहे. परंतु, हे गुप्त दान केले असून, याची माहिती उघड करण्यात आलेली नाही.
अयोध्येतील राम मंदिराला पैशांच्या स्वरुपात आणि सोने-चांदी स्वरुपात दान करणाऱ्या भाविकांची यादी हजारोंच्या घरात आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राला आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवरून एका भाविकाने महादान दिले आहे. मुंबईतील एका उद्योजकाने राम मंदिराला सुमारे १७५ किलो सोने दान केले आहे. या सोन्याची किंमत सुमारे १५० कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. उद्योजकाने दान केलेले सोने राम मंदिराच्या शिखर-कलशापासून ते दरवाजे आणि दाराच्या चौकटीपर्यंत वापरले गेले आहे. राम मंदिराच्या शिखरासह परिसरातील सहा मंदिरांचे शिखर-कलश सोन्याने सुशोभित केले आहेत. शेषावतार मंदिराच्या शिखराला सोन्याने सुशोभित करण्याचे काम अजूनही सुरू आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे निमंत्रित सदस्य आणि मंदिर बांधकामाचे प्रभारी गोपाळ राव यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, १७५ किलो सोने देणाऱ्या भाविकाने आपले नाव गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे.