शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा पंढरपूर येथे स्नेहमेळावा उत्साहातआमदार शेखर निकम आणि प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती.

चिपळूण : तालुक्यातील खरवते येथील शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयाचा सन २००१ ते २०२४ पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. या मेळाव्यासाठी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालयामार्फत स्थापन केलेल्या सह्याद्री ॲग्री अल्युम्नी असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील माजी विद्यार्थ्यांना संघटीत करणे, आजी व माजी विद्यार्थ्यांसोबत ऋणानुबंध कायम ठेवणे व विविध समाज उपयोगी उपक्रम राबवणे हा प्रमुख उद्देश ठेवून पंढरपूरमध्ये प्रथमच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी पंढरपूर व नजीकच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आमदार निकम यांनी विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधत विविध आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजतागायत झालेल्या शैक्षणिक प्रवासाचा त्यांनी आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती व्यवसाय करावा, एआय तंत्रज्ञान व इतर संबंधित बाबींचा वापर करून शेतीपूरक व्यवसायाला व्यावसायिक स्वरूप द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्राचार्य डाॅ. पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना संबोधित केले. सुमारे २५ वर्षांच्या कार्यकाळात हजारो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा साक्षीदार होता आले, तसेच त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होता आले व त्यांचे उज्ज्वल यश ही बघता आले ही भाग्याची गोष्ट आहे, असे ते म्हणाले. यावेळी अनेक यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार आमदार निकम व डाॅ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्यात सहभागी झालेले विद्यार्थी महाविद्यालयातील आठवणींनी भारावून गेले. पंढरपूर तथा विठुरायाच्या पावन नगरीत हा स्नेहमेळावा अगदी पालखीच्या पूर्वार्धात होण्याचा योगायोग नक्कीच पावित्र्यपूर्णता दर्शवत आहे. कोणताच आणि कुठलाच संबंध नसताना महाविद्यालयाच्या माध्यमातून आपणा सर्वांना आयुष्यभरासाठी एकत्रित बांधणारा धागा आदरणीय शेखर सर आणि ज्यांनी हा धागा हृदयापासून जपला व वेळोवेळी अधिक घट्ट केला असे आपले प्राचार्य आदरणीय पाटील सर यांच्याबद्दल सर्व माजी विद्यार्थ्यांनी ऋण व्यक्त केले व महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार डाॅ. हरिश्चंद्र भागडे, प्रा. प्रसाद साळुंके, विपुल घाग, प्रा. प्रणय ढेरे व प्रा. रवींद्र सरगर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button