मी नाराज आहे, या बातम्यांमध्ये कोणताही तथ्य नसून, मी गोष्टी आधी करतो आणि नंतर सांगतो- आमदार भास्कर जाधव


कोकणातील शिवसेना (ठाकरे गट) चे ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव यांनी पक्षातील नाराजीच्या चर्चांना सोमवारी चिपळुणात झालेल्या पत्रकार परिषदेत ठाम शब्दांत पूर्णविराम दिला. “मी नाराज आहे, या बातम्यांमध्ये कोणताही तथ्य नसून, मी गोष्टी आधी करतो आणि नंतर सांगतो. नियतीच्या पोटात काय दडलंय, हे कोणालाही सांगता येत नाही,” असे सूचक विधान करत त्यांनी चर्चांवर पडदा टाकला.

गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव यांच्याबाबत ठाकरे गटात नाराजीचे वारे वाहू लागले होते. मात्र, त्यांनी आज या चर्चांचा समाचार घेत स्पष्टपणे सांगितले की, “मी नाराज असल्याच्या बातम्यांना काही अर्थ नाही. माझ्या मनात नसलेल्या गोष्टींवर मी खुलासा करत नाही. माझ्या वक्तव्यावर जर कोणी सातत्याने बोलत असेल, तर त्यावर भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही.”

या पत्रकार परिषदेत भास्कर जाधव यांनी खुलासा केला की, रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांची जबाबदारी त्यांनी स्वखुशीने अंगावर घेतली आहे. या संदर्भात त्यांनी पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी घरी बोलावले होते. “मी ही जबाबदारी फक्त नावापुरती घेत नाही, तर पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरणार आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

“शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात मी भाषण केलं, त्यात कुठेही नाराजीचा लवलेश दिसला का? मी कशाला नाराज होईन? निर्णय घेण्याआधी मी सहकाऱ्यांशी बोलतो, विश्वासात घेतो, आणि निर्णय योग्य की अयोग्य याचा विचार करतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय वर्तुळात त्यांच्यावर नाराजीचे आरोप होत असतानाच त्यांनी याउलट भूमिका घेतल्याने अनेक तर्क-वितर्कांना वेगळी दिशा मिळाली आहे. “2022 साली पक्षात जे काही घडलं, त्यानंतर मी मैदानात राहून लढतोय, यालाच जर नाराजी समजलं जात असेल, तर ती चुकीची मांडणी आहे. मी अजूनही त्याच ठिकाणी ठामपणे पाय रोवून उभा आहे,” असे त्यांनी नमूद केले.

आपल्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना ते म्हणाले, “आठ वेळा निवडून आल्यानंतर थांबावे, हे माझे वैयक्तिक मत आहे. पण अजूनही माझ्यात संघर्ष करण्याची आणि लढण्याची ताकद आहे. कोणी मला निवृत्त होण्यासाठी सांगितलेले नाही.”

आपली कार्यशैली स्पष्ट करताना त्यांनी ठामपणे सांगितले की, “सतत स्वतःच सर्टिफिकेट देत बसणे, हे मला जमत नाही. मी आधी कृती करतो, मग बोलतो. यावेळीही मी स्वतःहून पुढे येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी घेतली आहे. ही माझी निष्ठा आणि पक्षनिष्ठा दर्शवणारी कृती आहे.”

भास्कर जाधव यांच्या या स्पष्टोक्तीमुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा थांबतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button