
परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू; पप्पा, तुम्ही कलेक्टर झालात का? उलट उत्तर देताच..
खासगी शिकवणीत बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर झालेल्या वादातून चिडलेल्या जन्मदात्या बापाने पोटच्या लेकीला एवढी बेदम मारहाण केली, की त्यात तिचा मृत्यू झाला. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे हा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार घडला. साधना धोंडिराम भोसले (वय १७) असे मृत मुलीचे नाव आहे.
या प्रकरणी गावातील माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले तिचे वडील धोंडिराम भगवान भोसले यांना आटपाटी पोलिसांनी खूनप्रकरणी अटक केली आहे. मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या तिची आई प्रीती यांच्यावर आपल्याच पतीविरोधात पोलिसांत फिर्याद देण्याची वेळ आली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धोंडिराम भोसले नेलकरंजी येथे माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. त्याचे वडील भगवान भोसले त्याच शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, पोलिसपाटील होते. पत्नी प्रीती गावच्या माजी सरपंच. धोंडिराम यांना एक मुलगा आणि साधना अशी मुलगी. साधना आटपाडीत बारावीचे शिक्षण घेत होती. तिला दहावीला ९२.६० टक्के गुण मिळाले होते. तिचा गावातील शाळेत पहिला क्रमांक आला होता. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ती तयारी करत होती.
तिला डॉक्टर करण्याचे कुटुंबीयांचे स्वप्न होते. त्यासाठी खासगी शिकवणी लावली होत्या. त्या शिकवणीत नुकतीच एक सराव परीक्षा झाली होती. त्यात तिला कमी गुण मिळाले. त्यामुळे वडील धोंडिराम चिडले होते. शुक्रवारी रात्री वडील धोंडिराम यांनी मुलगी साधनाला कमी गुण का मिळाले, याचा जाब विचारला. एवढा खर्च करतोय, कशी डॉक्टर होणार, तुझं कसं होणार, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. साधना हिने, ‘पप्पा, तुम्हालाही कमीच गुण मिळत होते. तुम्ही काय कलेक्टर झालात का? शिक्षक झालाच ना?’ असे उलट उत्तर दिले. त्यामुळे धोंडिराम यांना राग अनावर झाला.
त्यांनी घरातच असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला जबर मारहाण केली. पोटात लाथा घातल्या. पत्नीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. ते थांबले. त्यानंतर पुन्हा तासाभराने मुलीला मारहाण केली. त्या रात्री मुलीला अनेकवेळा वारंवार जबर मारहाण केली.
साधनाच्या डोक्याला जबर मार लागला. संपूर्ण शरीराला इजा झाली. ती अस्वस्थ होती. तिला शनिवारी दवाखान्यात नेले नाही. धोंडिराम भोसले शाळेला योग दिनाच्या कार्यक्रमासाठी गेले. घरी गेल्यावर मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यानंतर घाबरलेल्या भोसलेंनी साधनाला घेऊन सांगलीला दवाखान्यात आले. ‘मुलगी बाथरूममध्ये पडून जखमी झाली आहे’, असे भासवून त्यांनी उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने उपचार सुरू होण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.nelkaranjiatpadisangli
शवविच्छेदनातून उलगडा
शवविच्छेदन करताना मुलीच्या शरीरावर मारहाण केलेले अनेक व्रण आढळले. त्यामुळे पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. शवविच्छेदन करून शनिवारी रात्री अंत्यविधी केला. आई प्रीती भोसले यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी धोंडिराम यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.