
खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप भोगत असलेला न्यायबंदी संचित रजेवरून मागील ९ महिन्यांपासून फरार असलेला हा आरोपी अखेर पोलिसांच्या सापळ्यात अडकला
*रत्नागिरी-
खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना संचित (पॅरोल) रजेवरून फरार झालेल्या न्यायबंदीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नवी मुंबई येथून अटक करून रत्नागिरी येथे हजर केले आहे. मागील ९ महिन्यांपासून फरार असलेला हा आरोपी अखेर पोलिसांच्या सापळ्यात अडकला.
रत्नागिरी जिल्ह्यातील कारागृहातून संचित रजा घेऊन न परतणाऱ्या न्यायबंदी व पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून विशेष मोहिम हाती घेण्यात आली होती.
या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा चन्नाप्पा सरन्नाप्पा गंगवार (वय ३३ वर्षे, रा. गोवा, मूळ गाव कुमाटगी, जि. विजापूर, कर्नाटक) हा नवी मुंबईमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने तातडीने कारवाई करत २० जून २०२५ रोजी गंगवारला नवी मुंबईतून ताब्यात घेतले.
गंगवार याच्याविरुद्ध मरगाव पोलीस ठाणे गु.र.नं. 332/2011 भादंवि कलम 302, 364, 201 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल असून, त्याला कोलवाड, बारदेस (गोवा) येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मा. अपर पोलीस महासंचालक (कारागृह), गोवा यांनी ११ जुलै २०२४ ते ९ ऑगस्ट २०२४ या कालावधीसाठी त्यास पॅरोल मंजूर केला होता.
मात्र, त्याने विहित मुदतीत कारागृहात परत हजर न होता फरार राहण्याचा मार्ग पत्करला. त्यामुळे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गु.र.नं. 374/2024, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 262 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गेल्या ९ महिन्यांपासून फरार असलेल्या गंगवारला शोधून काढण्यात यश मिळाल्याबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कौतुक होत आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली. अटक केलेल्या आरोपीस पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.