
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची पंढरपूर सायकलवारी
रत्नागिरी :
प्रति पंढरपूर रत्नागिरी येथील श्री विठ्ठल मंदिरातून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे नऊ सायकलिस्ट आज पंढरपूर वारीसाठी रवाना झाले. काकड आरती झाल्यानंतर व या सायकलिस्टना मंदिराकडून श्रीफळ व प्रसाद पुष्प देऊन सायकलवारी यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद देण्यात आले.
यावेळी विठ्ठल मंदिर देवस्थानचे ज्येष्ठ भक्त तसेच देवस्थानचे पदाधिकारी विजय पेडणेकर, प्रमोद रेडिज यांच्यासह रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य उपस्थित होते. मंदिरातून सायकल वारीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला
यंदा प्रथमच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य सहभागी झाले आहेत. रत्नागिरी ते पंढरपूर हा ३०० किमीचा प्रवास दोन दिवसांत हे सायकल वारकरी पूर्ण करणार आहेत. २२ जूनला भागवत एकादशीच्या दिवशी राज्यभरातील वारकरी सायकल रिंगण सोहळा, संमेलन करणार आहेत.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत, विशाल भोसले, गजानन भाताडे, नारायण पाटोळे, अमित पोटफोडे, राकेश होरंबे, विकास कांबळे, अक्षय पोटफोडे, आरती दामले वारीमध्ये सहभागी झाले आहेत.
सायकलवारीची संकल्पना नाशिक सायकल क्लबने सुरू केली. त्यांचे ४०० सदस्य सायकल चालवत नाशिकहून पंढरपूरला जायचे. त्यातूनच पुढे या सायकलवारीचा जन्म झाला. सायकलवारीचे यंदाचे चौथे वर्ष आहे. पहिल्या वर्षी सायकल वारीचे आयोजन पंढरपूर सायकल क्लबने केले होते. दुसऱ्या वर्षी नाशिक, तिसऱ्या वर्षी बारामती व यंदा लातूर सायकल क्लब करत आहे.