
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर, पुढील काही दिवसांत हवामान अधिकच अस्थिर
राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, पुढील काही दिवसांत हवामान अधिकच अस्थिर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील काही तासांपासून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नवी मुंबई या भागांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे.भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 19 जूनपासून 22 जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहणार असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये विविध प्रकारचा पाऊस अनुभवायला मिळणार आहे.कोकण किनारपट्टीतील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत 19 जून रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसाठी आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून, शहरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांत 70 मिमीहून अधिक पावसाची नोंद होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.रायगड जिल्ह्यात पावसाचा विशेष फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आज सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
रोहा परिसरातील कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठली असून, परिसरात मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे अलिबाग, रोहा, तळा, महाड आणि पोलादपूर या तालुक्यांतील सर्व शैक्षणिक संस्थांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.