
पावसाळी मासेमारी बंदी कालावधित अवैध मासेमारी करणा-यांवर कठोर कारवाई करणार! मत्स्यव्यवसाय आयुक्त यांचे महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती च्या शिष्टमंडळास आश्वासन!
पालघर :* पावसाळी मासेमारी बंदी कालावधित अवैध मासेमारी करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या शिष्टमंडळास आश्वासन दिले आहे. तसेच मुंबई व उपनगर प्रमाणेच पालघर व ठाणे जिल्ह्यातील गस्ती नौका लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली.१७ जून रोजी महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती चे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांच्या नेतृत्वाखाली मत्स्यव्यवसाय आयुक्त यांची मुंबई कार्यालयात भेट घेतली. अवैध पावसाळी मासेमारी उरण व इतर ठिकाणी चालू असतांना कोणतीही कारवाई होत नाही.
आपल्यावर राजकीय दबाव आहे काय; नसेल तर कारवाई होत का नाही, कोस्ट गार्ड, तटरक्षक दल, सागरी पोलिस, महाराष्ट्र सागरी मंडळ, कस्टम, स्थानिक पोलिस यांना अधिकार दिले असताना शासनाच्या छाताडावर बसून अवैध मासेमारी होते कशी? अशा प्रश्नाचा भडीमार केला. पालघर, ठाणे, मुंबई येथिल गस्ती नौका का बंद केलेल्या असताना विचारणा केल्यानंतर मुंबई शहर , उपगनगर ला गस्ती नौका सुरु केल्या गेल्या. मात्र अजून ही पालघर, ठाणे येथे गस्ती नौका सुरु केल्या नाहीत या कडे लक्ष वेधले. झाई गावाच्या भागात गुजरात मधील बोटी मासेमारी करीत असल्याचे निदर्शनास आणले तसेच विमा, परतावा, संकट निवारण योजना तसेच इतर विषयावर चर्चा झाली.आयुक्त किशोर तावडे यांनी अवैध मासेमारी चालू आहे त्या वर कारवाई केल्याचे पुरावे दिले. तसेच या पुढे मासेमारी सुरु राहिली तर आपण स्वत: लक्ष घालून कठोर कारवाई करू, आजिबात हयगय केली जाणार नाही असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. तसेच पालघर व ठाणे जिल्ह्यातील गस्ती नौका सुरु करित आहोत असे सांगितले.
विविध शासकीय योजना मत्स्यव्यवसाय विभागाकडून लागू करण्यासाठी काम चालू असून त्याबाबत कार्यशाळा आयोजित केल्या जात असलयाचे त्यांनी सांगितले. या शिष्टमंडळात महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्यध्यक्ष रामकृष्ण तांडेल, जयेश भोईर, भुवनेश्वर धनु, भूषण निजाई, प्रफुल तांडेल, जयंत तांडेल सहभागी झाले होते.
*पावसाळ्याच्या आरंभी असणाऱ्या ६१ दिवसाच्या मासेमारी बंदीच्या काळात लगतच्या जिल्ह्यांमधील तसेच राज्यातील ट्रॉलर पालघर जिल्ह्याच्या मासेमारी हद्दीत येऊन मासेमारी करण्याचे अनेकदा प्रकार घडले आहेत. तर काही दिवस समुद्रात शांतता असल्याचे संकेत मिळाल्यास काही छुप्या पद्धतीने मासेमारीसाठी जाताना दिसतात. यावर अंकुश ठेवण्यास मत्स्य व्यवसाय विभागाकडून पुरेशी पावले घेतली जात असल्याने आर्थिक लाभाच्या अनुषंगाने धोकादायक परिस्थिती पूरक प्रमाणात मासेमारी करण्याचे प्रकार घडत असतात.