
जगातील टॉप १० शाळांमध्ये पुण्यातील ‘ही’ शाळा; महाराष्ट्राची थेट आंतरराष्ट्रीय यादीत मोठी झेप!
समाजाच्या प्रगतीतील शाळांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेण्यासाठी ब्रिटनमध्ये आयोजित जगातील सर्वोत्तम शाळा वार्षिक पुरस्कारांच्या विविध श्रेणींमध्ये बुधवारी चार भारतीय शाळांना पहिल्या १० स्पर्धकांमध्ये स्थान मिळाले. यात महाराष्ट्रासह हरियाणा, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमधील शाळांचा समावेश आहे. विविध श्रेणींमध्ये जगभरातील विजेत्यांची घोषणा ऑक्टोबरमध्ये केली जाणार आहे.महाराष्ट्रातील पुण्याजवळील खेड तालुक्यात असलेल्या जालिंदरनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची ‘विषयमित्र’ प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्याच नेतृत्वाखाली दर्जेदार शिक्षण देऊन सार्वजनिक शालेय शिक्षणात क्रांती घडवून आणल्याबद्दल निवड करण्यात आली आहे. ही प्रणाली एक समवयस्क-शिक्षण मॉडेल आहे. यामध्ये वेगवेगळ्या वयोगटांतील विद्यार्थी एकमेकांना शिकवतात व शिकतात.
या शाळेला सामुदायिक सहकार्य श्रेणीसाठी जगातील सर्वोत्तम शाळा पुरस्कारांच्या पहिल्या १० शाळांच्या यादीत स्थान मिळाले आहे.सामाजिक अडथळे दूर करण्यासाठी, तसेच एकही मुलगी मागे राहू नये यासाठी पोषण कार्यक्रम, शारीरिक व मानसिक आरोग्याची शिक्षणाशी सांगड घालून विविध समस्या असलेल्या मुलींचे जीवन बदलल्याबद्दल हरियाणाच्या फरीदाबादमधील एनआयटी ५ या मुलींच्या सरकारी माध्यमिक शाळेची निवड करण्यात आली आहे. निरोगी जीवनाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्वोत्तम शाळा पुरस्कारासाठीच्या १० अंतिम स्पर्धकांमध्ये या शाळेने स्थान मिळवले आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूतील जे. पी. नगर येथील एक्या स्कूल ही एक स्वतंत्र बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. वाराणसी येथील दिल्ली पब्लिक स्कूलला पर्यावरण संवर्धनाच्या जगातील सर्वोत्तम पुरस्कारासाठी अंतिम १० मध्ये स्थान मिळाले आहे.
ब्रिटनमधील टीफोर एज्युकेशन या संस्थेने करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सामुदायिक सहकार्य, पर्यावरण संरक्षणाचे कार्य, नवोन्मेष, प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे आणि निरोगी जीवनाला प्राधान्य देणे या बाबींकरिता जगातील सर्वोत्तम पाच शाळांसाठी पुरस्कार सुरू केले. वर्गखोल्यांमध्ये आणि त्यापलीकडे जीवन बदलणाऱ्या शाळांना एक व्यासपीठ प्रदान करणे हा या पुरस्कारांमागील प्रमुख उद्देश आहे.ब्रिटनमध्ये जागतिक स्तरावरच्या सर्वोत्तम शाळांच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रासह भारतातील चार शाळा पहिल्या दहामध्ये झळकल्या आहेत. यात पुण्याजवळील जिल्हा परिषदेच्या शाळेसह हरियाणा, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील शाळांचा समावेश आहे. या शाळांची निवड शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी करण्यात आली असून, ऑक्टोबरमध्ये विजेत्यांची घोषणा होणार आहे.