
काही जिल्हा परिषद सदस्य मुदत संपूनही शासकीय निवासस्थाने सोडेनात?
रत्नागिरी : जिल्हा परिषद सदस्यांची मुदत 20 मार्च रोजी संपल्यानंतर रत्नागिरी टीआरपी येथील निवासस्थानेही खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र अजूनही यातील काही निवासस्थाने पदाधिकार्यांचे कार्यकर्ते वापरत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. 21 मार्चपासून पदाधिकार्यांकडून वाहने जमा करण्यात आली. मात्र काही निवासस्थाने अजून खाली केलेली नाहीत. प्रशासक राज आल्याने त्यांच्या दालनाला कुलूपही लावण्यात आले. तसेच त्यांच्या पीए (स्वीय सहाय्यक) यांची बदलीही मूळ आस्थापनेवर करण्यात आली. जि.प. पदाधिकार्यांची वाहने प्रशासनाकडे जमा आहेत. जिल्हा परिषदेतील काही अधिकार्यांना वाहने नसल्याने अशा अधिकार्यांना ही वाहने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण व अर्थ सभापती, कृषी व पशुसंवर्धन सभापती, समाजकल्याण सभापती, महिला व बालकल्याण सभापती यांना जि. प. ची वाहने होती. या वाहनांसोबत चालकांची नियुक्ती होती. या सर्व पदाधिकार्यांची वाहने यंत्रशाळेत जमा करण्यात आली आहेत. मात्र काही निवासस्थाने अद्याप कार्यकर्त्यांसाठी ताब्यात ठेवली असल्याची चर्चा आहे.