
तळवली आगरवाडी अंगणवाडीचे सुरेश सावंत यांच्या हस्ते उद्घाटन
गुहागर तालुक्यातील तळवली आगरवाडी येथील अंगणवाडीचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीचे सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश (दादा) सावंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
उद्घाटनाच्या दिवशीच सुरेश सावंत यांचा वाढदिवस असल्याने तोही ग्रामस्थांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर बागकर, तालुकाध्यक्ष साहिल आरेकर, उपाध्यक्ष दीपक शिलधनकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष सोलकर, तळवलीचे उपसरपंच संतोष जोशी, सदस्य सुनील मते, अंगणवाडी सेविका सुनिता सांगळे, प्रेरणा पवार, मदतनीस अश्विनी पवार, मितांजली पवार तसेच ग्रामस्थ दत्तात्रय किंजळे, सूर्यकांत खोकरे, सुरेश जोशी, सुरेश बारे, चंद्रकांत शिगवण, दत्ताराम आग्रे, संजय आग्रे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंगणवाडीसाठी सुरेश सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे खासदार सुनील तटकरे व आमदार आदिती तटकरे यांच्या माध्यमातून निधी मंजूर झाला होता. कित्येक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे.
या वेळी बोलताना तालुकाध्यक्ष साहिल आरेकर म्हणाले, “सुरेशदादा जर जिल्हा परिषदेत गेले तर आपल्याला हक्काचा माणूस मिळेल. त्यांच्या माध्यमातून आणखी अनेक विकासकामे साध्य करता येतील.”
मनोगत व्यक्त करताना सुरेश सावंत म्हणाले, “ही अंगणवाडी होऊ नये म्हणून काहींनी प्रयत्न केले; मात्र खासदार सुनील तटकरे व आमदार आदिती तटकरे यांच्या सहकार्यामुळे हे काम पूर्ण झाले. मी फक्त पाठपुरावा करून ती मंजूर करून घेतली. पुढेही ग्रामस्थांसाठी अशा अडथळ्यांवर मात करून कामे पूर्ण करीन. भविष्यात संधी मिळाली तर जिल्हा परिषदेत नक्की जाईन, यासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे राहील,” असे सांगून वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार मानले.




