
रत्नागिरी जिल्ह्यात “स्टॉप डायरिया” मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ उत्साहात संपन्न…
रत्नागिरी जिल्ह्यात बालमृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने “स्टॉप डायरिया” मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ,मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. तुषार कुंभार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 16/06/2025 रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोकण नगर,रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.याप्रसंगी पी.एच.एन. श्वेता तारये, प्रिया पेडणेकर,आरोग्य सहाय्यक चेतन शेटे, तुषार साळवी,श्रीम.पी.यु.भाटकर,श्रीमती ए. डी. शितोळे,यश फाऊंडेशन चे विदयार्थी व प्रशिक्षक,सर्व आरोग्य कर्मचारी,आशा गटप्रवर्तक,आशा स्वयंसेविका तसेच लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.
या अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 16 जून ते 31 जुलै दरम्यान 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांमध्ये होणाऱ्या अतिसार आजाराविषयी जनजागृती, ओआरएस आणि झिंक गोळ्यांचे वितरण, स्वच्छतेबाबत सूचना तसेच घरोघरी संपर्क उपक्रम राबवण्यात येणार आहेत. आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांचा या उपक्रमात सक्रिय सहभाग असून, बालमृत्यू दर घटविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे. दूषित पाण्यामुळे अतिसाराचे (डायरिया) प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेता, आरोग्य विभागाने नागरिकांना अतिसारापासून बचाव करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत.अतिसार हा लहान मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्येही गंभीर आजार होऊ शकतो, ज्यामुळे शरीरातील पाणी आणि क्षारांचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास हा जीवघेणाही ठरू शकतो.
अतिसार टाळण्यासाठी काय करावे?
* हात स्वच्छ धुवा: जेवण्यापूर्वी आणि शौचानंतर साबणाने आणि स्वच्छ पाण्याने हात धुवा.
* सुरक्षित पाणी प्या: उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्या. बाटलीबंद पाणी वापरत असल्यास, त्याची सील तपासा.
* स्वच्छ अन्न खा: ताजे आणि गरम अन्न खा. बाहेरचे उघड्यावरील पदार्थ खाणे टाळा.
* फळे आणि भाज्या धुवा: फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवा.
* शौचालयाचा वापर करा: शौचालयाचा वापर करा आणि त्याची स्वच्छता राखा.
अतिसाराची लक्षणे आणि उपाय:
* लक्षणे: वारंवार शौचास होणे (पातळ संडास), पोटात दुखणे, उलट्या होणे, ताप येणे, अशक्तपणा जाणवणे.
* तातडीचा उपाय: अतिसार झाल्यास, शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ORS (ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन) घ्या. जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
* पौष्टिक आहार: अतिसार थांबल्यानंतरही हलका आणि पौष्टिक आहार घ्या.अतिसाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन किंवा आरोग्य विभागाशी संपर्क साधून तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुध्द आठल्ये यांनी केले आहे.
(डॉ. अनिरुद्ध आठल्ये ),
जिल्हा आरोग्या अधिकारी,
जिल्हा परिषद रत्नागिरी