
मनसेच्या वतीने महावितरणला निवेदन
*रत्नागिरी : वाढलेल्या झाडांच्या फांद्यामुळे विद्युत वाहिन्या तुटण्याची शक्यता असून, त्यामुळे जीवितास धोका उद्भवू शकतो याची गांभीर्याने दखल घेऊन महावितरणने विद्युत वाहिन्यांवर येणाऱ्या वृक्षांच्या फांद्या तोडाव्यात यासाठी सहाय्यक अभियंता शहर शाखा क्रमांक ३ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, अरविंद मालाडकर, सचिन शिंदे, महेंद्र गुळेकर आणि बाबय भाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली १७ जून रोजी महावितरणच्या सहाय्यक अभियंता शहर शाखा क्रमांक ३ यांना हे निवेदन शहर सचिव गौरव चव्हाण, विभाग अध्यक्ष शैलेश मुकादम आणि महिला सेना शहर सचिव सौ. संपदा राणा-रसाळ यांनी दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, “जयस्तंभपासून राजिवडा येथे जाणाऱ्या रस्त्यावर दोन उंच झाडे वाढलेली आहेत. त्या खालून विद्युत वाहिन्या जात असून झाडांच्या खालीच ट्रान्सफॉर्मर आहेत आणि बाजूला वडापावच्या गाड्या किंवा चहाच्या टपऱ्या चालू आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. बऱ्याच वेळा सोसाट्याचा वारा सुटतो. ही झाडे जुनाट असल्यामुळे त्यांच्या फांद्या तुटून त्या वाहिन्यांवर पडून विद्युत वाहिन्या तुटण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जीवितास धोका उद्भवू शकतो. तसेच शहरात अनेक ठिकाणी अशा समस्या उद्भण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर या झाडांच्या फांद्या छाटण्यात याव्यात जेणेकरून संभाव्य धोके टाळता येतील.”




