झेडपी, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे ठरले!

मुंबई : राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या गट व गणनिहाय अंतिम मतदार याद्या २७ ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ३२ जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. दिवाळीनंतर मतदार याद्या अंतिम होणार असल्याने प्रत्यक्ष निवडणूक नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला दिला आहे. तयानुसार निवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्रिस्तरीय निवडणुकीत ३२ जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणाऱ्या ३३६ पंचायत समित्यांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेतली जाईल. त्यानंतर नगरपालिका व अंतिम टप्प्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत.

जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या गटाची व पंचायत समितीच्या गणांची प्रभाग रचना नुकतीच पूर्ण केली आहे. आता मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाला दिला आहे. या निवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाची १ जुलै २०२५ ची मतदार यादी विचारात घेतली जाणार आहे.

त्यानुसार जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये व पंचायत समितीच्या गणांमध्ये विधानसभा मतदार संघाची विद्यमान यादी विभाजीत केली जाणार आहे. ८ ऑक्टाेबरपर्यंत प्रारुप मतदार यादी तयार करावी. ८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. २७ ऑक्टोबर रोजी अंतीम मतदार यादी मतदान केंद्रनिहाय प्रसिद्ध करावी, असे आयोगाने जिल्हाधिकारी यांना मंगळवारी पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

भंडारा, गोंदीया, मुंबई शहर व मुंबई उपनगर हे चार जिल्हे वगळून राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व त्याअंतगत ३३६ पंचायत समित्या यांच्यासाठी हा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २७ ऑक्टोबरला मतदार यादी व मतदान केंद्रे जाहीर झाल्यावर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तारीख जाहीर केली जाईल. नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडतील, अशी दाट शक्यता आहे.

या निवडणुका ‘मिनी विधानसभा’ निवडणुका मानल्या जातात. राज्यभरातील ग्रामीण मतदारांचा काैल या निवडणुकांमधून स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील बाबी लक्षात घेवून आघाडीत की स्वतंत्रपणे लढवायच्या याचा निर्णय होईल, असे महायुती व महाविकास आघाडीने जाहीर केलेले आहे. त्यामुळे दिवाळीनंतर राज्याच्या ग्रामीण भागात या निवडणुकांचा मोठाच धुरळा उडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button