
पश्चिम रेल्वेचा ज्येष्ठ नागरिकांना दिलासा; लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष डब्याची निर्मिती !
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेतून दररोज सुमारे ५० हजार ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. परंतु, त्यांच्यासाठी एका लोकलमध्ये केवळ १४ आरक्षित आसने उपलब्ध करण्यात आली असून गर्दीच्या वेळी या आसनापर्यंत पोहचणे ज्येष्ठ नागरिकांना अशक्य होते.
ही बाब लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकलच्या एका मालडब्याचे रुपांतर ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष डब्यात करण्यात येणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील १०५ लोकलमधील प्रत्येकी एका मालडब्यात बदल करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ५.४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हे बदल एका वर्षाच्या आत करण्याचा संकल्प पश्चिम रेल्वेने सोडला आहे.
गेल्या काही वर्षांपासून लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. काही वेळा प्रवासादरम्यान विविध कारणांमुळे प्रवाशांचा मृत्यू होतो. गर्दीमुळे प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश करता येत नाही. गर्दीच्या लोंढ्यामुळे अनेकांचा श्वास गुदमरतो. ज्येष्ठ नागरिकांना लोकलमधून प्रवास करणे अत्यंत कठीण होत आहे.
मध्य आणि पश्चिम उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक लोकलमध्ये काही जागा आरक्षित आहेत. मात्र, लोकलमधील गर्दीचा विचार करता ज्येष्ठ नागरिकांना त्या जागेपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन अपंग प्रवाशांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा उपलब्ध करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे करण्यात आली होती.
ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा उपलब्ध करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने न्यायलयाला आश्वासित केले होते. तसेच लवकरात लवकर कार्यादेश देण्याचे आदेश न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले होते. त्यानंतर आता पश्चिम रेल्वे प्रशासनाने या कामाला सुरुवात केली आहे.
पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये १४ जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव आहेत. चर्चगेटच्या टोकापासून लोकलच्या तिसऱ्या आणि १२ व्या डब्यामध्ये या जागा राखीव आहेत. त्यामुळे रेल्वे मंडळाने लोकलमधील एक मालडब्याचे ज्येष्ठ नागरिकाच्या विशेष डब्यात रुपांतर करण्यास मान्यता दिली आहे. चर्चगेटच्या टोकापासून लोकलच्या सातव्या डब्यातील मालडब्याचे ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष डब्यात रुपांतर केले जाणार असून यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.
या मालडब्यामध्ये सुधारणा केल्यानंतर १३ प्रवाशांची आसन व्यवस्था आणि ९१ प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा होईल. तसेच गर्दीच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांना लोकलमधून चढणे आणि उतरणे सहज शक्य होईल. हे बदल १०५ सामान्य लोकलच्या डब्यांमध्ये टप्प्याटप्प्याने केले जातील. एक वर्षाच्या आत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. तसेच लोकलमधील इतर मालडबे कायम ठेवले जातील, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.