
दापोली काजू कारखान्यातील लिफ्ट कोसळून महिलेचा मृत्यू मार्च महिन्यातील घटनेबाबत कारखाना व्यवस्थापक आणि लिफ्ट ऑपरेटरवर निष्काळजीपणाचा आता गुन्हा दाखल.
दापोली तालुक्यातील वळणे एमआयडीसी येथील कोकण फळ प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित या कारखान्यात २ मार्च २०२५ रोजी ११.३५ वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. कारखान्यात काम करत असताना लिफ्ट कोसळून प्रविणी प्रभाकर कासेकर (वय ५५, रा. ओळगाव, विजयशंकरवाडी, ता. दापोली) या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता कारखाना व्यवस्थापक आणि लिफ्ट ऑपरेटरवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रविणी कासेकर या गेल्या पाच वर्षांपासून या कारखान्यात काम करत होत्या.
घटनेच्या दिवशी, २ मार्च रोजी, त्या नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजता कामावर गेल्या होत्या. काजू फॅक्टरीमध्ये चेन पुली लिफ्टखाली काजूच्या बिया साफ करत असताना, सकाळी ११.३५ च्या सुमारास लिफ्टचा बार तुटला आणि ती थेट प्रविणी कासेकर यांच्या अंगावर कोसळली.या दुर्घटनेत त्यांना डोक्याला, तसेच उजव्या पायाला गंभीर आणि किरकोळ जखमा झाल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर फिर्यादी प्रभाकर यशवंत कासेकर (वय ५९, रा. ओळगाव) यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांनी केलेल्या तपासात असे समोर आले आहे की, कारखान्याचे व्यवस्थापक धनंजय लक्ष्मणराव यादव (रा. वळणे एमआयडीसी, ता. दापोली) यांनी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नव्हती. तसेच, चेन पुली लिफ्टची नियमित तज्ञांकडून तपासणी न करता निष्काळजीपणा केल्याचे दिसून येत आहे. याशिवाय, लिफ्ट ऑपरेटर प्रणय प्रकाश पवार (रा. दापोली) याने क्षमतेपेक्षा जास्त काजू बियांची पोती लिफ्टवर भरून निष्काळजीपणा केल्यामुळेच हा अपघात घडल्याचे निष्पन्न झाले आहे.दापोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १०६ (१), १२५ (A), १२५ (ए), ३ (५) अन्वये गुन्हा (गु.र.नं. ११५/२०२५) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही, पोलीस पुढील तपास करत आहेत.