
माहेर संस्थेतून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण
रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा-निवळी येथे पालनपोषणासाठी दाखल झालेल्या दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने संस्थेच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याची तक्रार रत्नागिरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ही घटना १२ जून रोजी घडली.
याबाबत पोलिसांकडून उपलब्ध झालेली सविस्तर माहिती अशी : माहेर संस्थेतील मुलींच्या बाल-गृहामधील दोन अल्पवयीन मुली पुनम अनिल कांबळे (१५ वर्षे) आणि प्रीती रवी बनसोडे (१७ वर्षे) या १२ जून रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान संस्थेच्या कंम्पाउंडच्या बाजूला असलेल्या नळावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या अल्पवयीन वयाचा गैरफायदा घेऊन अज्ञात इसमाने संस्थेच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले आहे. याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ११७/२०२५ भा.न्या.सं. कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपहरीत मुलींचे वर्णन असे : १) नाव – पूनम अनिल कांबळे, वय – १५ वर्षे, शिक्षण- नववी पास, उंच – ४ फूट ४ इंच, रंग – सावळा, बांधा – सडपातळ, चेहरा – उभा, केस – काळे व लांब, नाक – सरळ, डोळे – काळे, कपडे – अंगात गुलाबी रंगाचा फ्रॉक, इतर वर्णन – पायात सॅन्डल असून अंगावर दागिने नाहीत व सोबत मोबाइल नाही.
2) नाव – प्रीती रवी बनसोडे, वय – १७ वर्षे, शिक्षण – पाचवी पास, उंची – ५ फूट, रंग – निमगोरा, बांधा – मध्यम, चेहरा – उभा, केस – छोटे व काळे, नाक – सरळ, डोळे – काळे, कपडे – अंगात काळ्या रंगाचा फ्रॉक, इतर वर्णन – पायात सॅन्डल असून अंगावर दागिने नाहीत व सोबत मोबाइल नाही.
वरील नमूद अल्पवयीन मुलींबाबत काही माहिती मिळाल्यास रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे फोन नं. 02352-230133 व 9321211516 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा व माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.