
नवरात्रीत रंगू लागला गरबा-दांडिया
रत्नागिरी : गुजराती व हिंदी गीतांच्या तालावर रंगीबेरंगी पेहरावातील युवक-युवतींचा दांडिया, गरबा सध्या शहरात रंगू लागला आहे. नवरात्रोत्सवातील झगमगत्या रात्रीतील मनोवेधक जल्लोष आता चांगलाच रंगत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक वेशभूषा, वाद्ये, ध्वनिवर्धकावरील ठसकेबाज गाण्यांवर पावले थिरकत आहेत. शहरातील विविध ठिकाणी होणार्या गरबा-दांडिया पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. या नृत्याने रात्र आता बहरू लागल्याचे चित्र आहे. नवरात्रोत्सवात विविध मंडळे, संस्थांतर्फे गरबा-दांडियाचे आयोजन करण्यात येते. त्यात मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी होतात. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच गरबा- दांडियाला सुरवात होते. मात्र दिवस पुढे सरकतात तशी रंगत वाढते. शहरातील मोठ्या गरबा-दांडिया स्पर्धांसह विविध ठिकाणी होणार्या दांडियाचे कार्यक्रम देखील पाहण्यासाठी बघणार्यांची गर्दी होत आहे. नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या दिवसांत ही गर्दी आणखी वाढत जाईल. शहरातील किल्ला येथे फॅन्सी दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चिमुकल्यांनी विविध वेशभूषा धारण करत लक्ष्य वेधले.