
जिल्हा शासकीय रूग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीसाठी येताना फक्त एकाच नातेवाईकाला प्रवेश दिला जाणार
जिल्हा शासकीय रूग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीसाठी येताना फक्त एकाच नातेवाईकाला प्रवेश दिला जाणार आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याने दिव्यांगांनी स्वतःच्या आरोग्यविषयक सुविधेला प्राधान्य देवून आवश्यक असल्यास प्रवास करावा, तपासणीसाठी येण्यापूर्वी सोबतच्या नातेवाईकाला कोविडसदृश्य आजार नसल्याची खात्री करावी. नाक, तोंड पूर्णतः झाकेल असा मास्क लावून सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करणे सर्वांवर बंधनकारक आहे. सर्व दिव्यांग, त्यांच्यासोबत येणार्या नातेवाईकांची कोविडसदृश्य तपासणी झाल्यानंतर अंतिम दाखल्यासाठी त्यांना सिव्हिलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
दिव्यांग तपासणी शासकीय कामाचे दिवशी दर बुधवार, शुक्रवारी जिल्हा शासकीय रूग्णालयातील दिव्यांग विभागात करण्यात येईल. दर बुधवारी पाच कर्णबधीर, दहा अस्थिव्यंग, पाच दृष्टीदोष असलेल्या दिव्यांगांची तपासणी होईल. दर शुक्रवारी फक्त पाच दृष्टीदोष, पाच कर्णबधीर, दहा मानसिक मतिमंद, दहा बहुविकलांग दिव्यांगांची तपासणी होईल. कर्णबधीर रूग्णांना आवश्यक बेरा चाचणी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपलब्ध आहे.
दिव्यांगांनी तपासणीला येण्यापूर्वी आपल्यातील दोषांनुसार दर बुधवारी कनर्णबधीर, अस्थिव्यंग दिव्यांगांनी शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सिव्हिलमधील हेल्प डेस्क नंबर ०२३५२- २२६०६० यावर संपर्क साधावा. दर शुक्रवारी दृष्टीदोष, मानसिक मतिमंद, बहुविकलांग दिव्यांगांनी याच कालावधीत वरील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे. अपॉईंटमेंट न घेता आल्यास कोणत्याही दिव्यांगाची सिव्हिलमध्ये तपासणी केली जाणार नाही. दिव्यांगांची तपासणी करून ऑनलाईन अर्ज www.swavalambancard.gov.in या संकेतस्थळावर करून त्याच्या प्रतिसह आधारकार्ड, रेशन कार्डची झेरॉक्स प्रत, आपल्यासोबत आणणे आवश्यक आहे. आपल्या आजाराची सर्व कागदपत्रे उपचारांची फाईल असल्यास पूर्वीचे मूळ कागदपत्र, शासकीय नोकरीत असल्यास संबंधित विभागप्रमुखाचे तपासणीसंदर्भातील पत्र सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी दिव्यांग विभागातील भौतिकोपचार तज्ञ नितीन चौके, अमित वायंगणकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा शासकीय रूग्णालयामार्फत करण्यात आले आहे.
www.konkantoday.com




