राणेंविरोधात प्रकाश महाजन यांनी दंड थोपटले


मनसे नेते प्रकाश महाजन आणि नारायण राणे यांच्यातील वाद पेटला आहे. राणेंविरोधात प्रकाश महाजन यांनी दंड थोपटले आहेत. राणेंच्या आव्हानानंतर प्रकाश महाजन छत्रपती संभाजीनगर इथल्या क्रांती चौकात पोहोचले.राणेंनी सांगावं तिथे मी येतो असं आव्हान महाजन यांनी दिलं आहे. राणेंनी धमकी दिल्याचा आरोप प्रकाश महाजन यांनी केला आहे.
राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र त्याचवेळी मत्स्योद्योगमंत्री नितेश राणेंनी या युतीची खिल्ली उडवली आणि नव्या वादाला तोंड फुटलं. प्रकाश महाजनांच्या टीकेनंतर खासदार नारायण राणे चांगलेच संतापले. नारायण राणेंनी थेट सोशल मीडियावरुन प्रकाश महाजनांचे वाभाडे काढत थेट इशारा दिला.
प्रकाश महाजन कोण? राजकारण, समाजकारण, विधायक क्षेत्रात आपलं योगदान काय? निलेश, नितेश आणि नारायण राणे हे दूरच, वैचारिक उंची ठरवणारे तुम्ही कोण? तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात. परत बोलललात तर उलट्या करायला लावेन अशी धमकी नारायण राणेंनी दिली. इतकंच नाहीतर राणे समर्थकांनी प्रकाश महाजनांना धमकावल्याची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली.
आधी राणेंचं ट्विट आणि त्यानंतर राणे समर्थकाच्या धमकीमुळे प्रकाश महाजन संतापले. त्यांनी राणेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली. धमकीनंतर प्रकाश महाजन यांनी राणेंविरोधात दंड थोपटत प्रतिआव्हानही दिलं. यानंतर पोलीसही प्रकाश महाजन यांच्या घरी पोहोचले आणि क्रांती चौकात जाऊ नये असे आवाहन केलं. मात्र पोलिसांसोबत तब्बल अर्धा तास वाद करत अखेर प्रकाश महाजन क्रांती चौकात पोहोचले..तब्बल अर्धा तास प्रकाश महाजन क्रांती चौकात थांबले. मात्र कुणीही न आल्यानं ते आल्या पावली माघारी परतले.
प्रकाश महाजनांच्या टीकेला राणे पिता पुत्रांनीही प्रत्युत्तर दिलंय. राणेंविरोधात पोलिसांत तक्रार देणार असल्याचं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय. त्यामुळे आगामी काळात राणे विरुद्ध प्रकाश महाजन संघर्ष निवळणार नसल्याची चिन्हं आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button