
रत्नागिरी डायटच्या प्रशासनाने शिक्षकांवरील हुकूमशाही त्वरित थांबवावी अन्यथा मोर्चा काढू शिक्षक भारतीचा इशारा
सध्या माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांसाठी रत्नागिरीमध्ये एकाच ठिकाणी सुरू आहे. यामुळे शिक्षकांची प्रचंड कुचंबणा होत आहे. त्याशिवाय डायटच्या प्रशासनाकडून अतिशय चुकीच्या पद्धतीने शिक्षकांना वागविले जात आहे. शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी तालुकावार प्रशिक्षण केंद्र देऊन शिक्षकांना सोयीनुसार चांगले प्रशिक्षण देण्यात यावे अशी आग्रही मागणी शिक्षक भारतीच्या वतीने जाहीर प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.याबाबतची माहिती जिल्हा कार्यवाह निलेश कुंभार यांनी दिली आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत दरवर्षी विविध शिक्षक प्रशिक्षणासाठी तालुकावार किंवा दोन-तीन तालुक्यासाठी एक अशा प्रकारची शिक्षक प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात येत होती. त्यानुसार शिक्षकांना अत्यंत चांगल्या पद्धतीने व सोयीच्या ठिकाणी प्रशिक्षणाला जावे लागत होते. त्यामुळे शिक्षकही अतिशय उत्साहीपणाने सर्व ठिकाणी वेळेत हजर राहून प्रशिक्षणाचा लाभ घेत होते. मात्र सध्या डायटने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यासाठी केवळ एकच प्रशिक्षण केंद्र व तेही रत्नागिरी येथे ठेवून एकांगी कारभार सुरू केला आहे. याबद्दल शिक्षकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सदर एकाच प्रशिक्षण केंद्रामुळे शिक्षकांना दूरदूरच्या डोंगरातून व खेडेगावातून प्रशिक्षणासाठी रत्नागिरीला हजर राहावे लागते. या शिक्षकांना रत्नागिरीमध्ये शिक्षकांसाठी निवासाची कोणतीही सुविधा नाही. प्रशिक्षणा दरम्यान कोणतेही प्रकारचा भत्ता नाही, त्याशिवाय शिक्षकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत. अत्यंत अडचणीच्या स्वरूपात हे प्रशिक्षण राबविले जात आहे. मुळातच शिक्षकांसाठी निवासाची सोय उपलब्ध नसल्याने आणि एकच केंद्र असल्याने शिक्षकांना दूरदूरच्या ठिकाणाहून रत्नागिरीत यावे लागते. त्यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याबाबत कुठलाही गांभीर्याने व सदभावनेने विचार केला जात नाही. निव्वळ शासनाचे अनुदान खर्ची टाकणे आणि शिक्षकांना वेठीस धरणे एवढाच हेतू प्रशासनाचा दिसून येतो काय? असा सवाल जिल्हा अध्यक्ष संजय पाथरे यांनी उपस्थित केला आहे.
सदरच्या प्रशिक्षणामधील सद्यस्थिती तात्काळ बदलून हे प्रशिक्षण विभागवार दोन तीन तालुक्यासाठी एक प्रशिक्षण केंद्र राबवून करण्यात यावे अशी मागणी शिक्षक भारतीच्या करण्यात आली आहे.
यानंतरच्या प्रशिक्षणामध्ये जर सदरची मागणी मंजूर झाली नाही तर शिक्षक भारतीच्या वतीने जिल्हा स्तरावर शिक्षकांचा प्रचंड मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध करण्यात येईल असेही निषेध व्यक्त करताना शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.