
सागवे, नाखेरे येथील रस्ता कामाच्या उत्खननात सापडलेल्या तोफेची दखल शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा सामंत यांनी घेतली.
राजापूर तालुक्यातील सागवे, नाखेरे येथील रस्ता कामाच्या उत्खननात सापडलेल्या तोफेची दखल शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा सामंत यांनी घेतली आहे. शुक्रवारी त्यांनी सागवे परिसरात जाऊन सापडलेल्या तोफेची पाहणी केली.या सापडलेल्या तोफेचे त्याच परिसरात जतन व्हावे त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांची विशेष बैठक सागवे येथे आयोजित करण्याबाबतचे सूतोवाच अपूर्वा सामंत यांनी केले.सागवे, नाखेरे येथे रस्त्याच्या कामादरम्यान सुरू असलेल्या खोदकामात एक तोफ सापडली होती. ही तोफ शिवकालीन युगातील असल्याची चर्चादेखील सुरु होती. सागवे, नाखरे परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यदलाशी संबंधित सरदार तेथे वास्तव्य करून होते. त्यामुळे कदाचित त्यांच्या काळातील ती सापडलेली तोफ असावी, असा कयास व्यक्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सापडलेल्या तोफेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा सामंत यांनी घेतली आणि शुक्रवारी सागवे, नाखरे येथे भेट देवून तोफेची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे संघटक भरत लाड, शिवसेनेचे निरीक्षक संदेश पटेल, ओंकार पेडणेकर आदी उपस्थित होते. त्यावेळी अपूर्वा सामंत यांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणीदेखील केली.