अभूतपूर्व उत्साहात संत निवृत्तीनाथ पालखीचे प्रस्थान; त्र्यंबकेश्वरमध्ये वारकऱ्यांचा मेळा !

नाशिक :* पुंडलिक वरदे हरी विठ्ठलच्या जयघोषात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आषाढी पालखी सोहळा मंगळवारी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. विठूरायाचा गजर करीत वारकऱ्यांनी त्र्यंबकेश्वर सोडले. पालखी सोहळ्यास निरोप देण्यासाठी त्र्यंबकेश्वरचे नागरिक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते.आषाढी पालखी सोहळ्यात संत निवृत्तीनाथ यांच्या पालखीस विशेष महत्व आहे. पालखीला आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. पालखी सोहळ्याचे सारथ्य करणाऱ्या अश्वालाही सजविण्यात आले होते. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आले होते.

वारकऱ्यांच्या मांदियाळीने त्र्यंबक नगरी फुलली.मंगळवारी दुपारी परंपरेने मोहन महाराज बेलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, जयंत महाराज गोसावी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पादुका चांदीच्या रथात ठेवण्यात आल्या. त्र्यंबक नगरीत पालखीच्या मिरवणुकीनंतर टाळ मृदंगाच्या गजरात श्रींचे रथातून पंढरपूरकडे प्रस्थान झाले, पालखी सोहळ्यात काही नवीन दिंड्या सहभागी झाल्या. वारकऱ्यांसाठी लागणारे पाणी, पालखी तळांवरील निवासाची व्यवस्था, शौचालय, इत्यादी मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी सोहळा पेगलवाडी येथील महानिर्वाणी आखाड्यात पहिल्या दिवशी मुक्कामास थांबला.पंढरपूरपर्यंत यंदा तीन बैलजोड्या रथासाठी असून साधारणतः ३० हजार वारकरी पालखी सोहळ्याबरोबर चालणार आहेत. पालखी सोहळ्याचा थाट याचि डोळी याचि देही अनुभवतांना अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. पालखी सोहळ्यापुढे असणारा अश्व, विणेकऱ्यांचा ताल, टाळ मृदूंगाचा नाद, तुळशी डोईवर घेत चालणाऱ्या माऊली.

वारकऱ्यांकडून अखंड सुरू असलेला विठु नामाचा गजर, पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यासाठी रांगोळ्या, फुलांची आरास, यामुळे सर्व वातावरण भक्तिमय आणि विठूमय झाले होते. पालखी बुधवारी सकाळी नाशिकच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाकडून दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत.त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा मंगळवारी पंढरपूरसाठी रवाना झाला. मंगळवारचा संपूर्ण दिवस त्र्यंबकेश्वरसाठी विठूमय झाला. कुशावर्तासह सर्वत्र वारकऱ्यांची जणूकाही जत्राच भरली होती. अभूतपूर्व उत्साहात संत निवृत्तीनाथांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी जमली होती. पेगलवाडी येथील पहिल्या मुक्कामानंतर बुधवारी सकाळी पालखी नाशिकच्या दिशेने निघेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button