
चिपळुणात प्लास्टिकचा वापर, तिघांना दंड, चिपळूण नगर पालिकेची मोहीम.
चिपळूण शहरातील बाजारपेठेत प्लास्टिकचा वापर करणार्या व्यावसायिकांवर नगर परिषदेकडून दंडाची कारवाई करण्यास सुरूवात झाली असून तिघांकडून ४ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. १२ जणांना समज देण्यात आली आहे. तसेच सर्वांना सूचना देण्याचे कामही जोरात सुरू असल्याने प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहे.प्लास्टिकचे वाढते प्रमाण डोकेदुखी बनत असल्याने शासनाने प्लास्टिक प्रदूषण निर्मूलनासाठी कडक धोरण अवलंबले आहे. त्यामुळे नगर परिषदेने शासनाच्या सूचनांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातूनच चार दिवसांपासून पहिल्या टप्प्यात आपल्या कार्यालयाचा परिसर प्लास्टिक निषिद्ध क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.एवढेच नव्हे तर व्यावसायिकांना प्लास्टिकचा वापर न करण्याच्या सूचना केल्या जात आहेत. यातूनच मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आदींच्या पथकाने कारवाई करण्यासही सुरूवात केली आहे. येथील तीन व्यावसायिकांकडून ४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून यापुढे प्लास्टिकचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास पहिल्या प्रसंगात ५ हजार, दुसर्यांदा १० हजार, तर तिसर्यांदा मिळून आल्यास २५ हजार रुपये व तीन महिने कारावास अशी शिक्षा केली जाणार असल्याचा इशारा देण्यात येत आहे.www.konkantoday.com