
मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात; पण कुणालाच खबर नाही, अपघातग्रस्त कारमध्ये तिघांचे कुजलेले मृतदेह सापडले
वर्दळ असणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आणि कार रस्ता सोडून थेट खाली कोसळली. पण या अपघाताची खबर कोणालाच समजली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गुरे चारण्यासाठी घेऊन गेलेल्या महिलेला झाडाझुडपात अपघातग्रस्त कार दिसली.या कारमध्ये तिघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली. हा अपघात चार ते पाच दिवसांपूर्वी झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील उंबरमाळी येथे गुरे चारण्यासाठी महिला गेली होती. तिचे लक्ष झाडाझुडपात गेले असता त्याठिकाणी तिला अपघातग्रस्त कार दिसली. त्या महिलेने जवळ जाऊन पाहिले असता कारमधून दुर्गंधी येऊ लागली. तिने तत्काळ याविषयी उंबरमाळी ग्रामस्थांना सांगितले. ग्रामस्थांनी याची माहिती कसारा पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन टीमला दिली.क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कार लिफ्ट करून बाहेर काढण्यात आली. त्यावेळी कारमध्ये तीन तरुणांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले. ही कार अंधेरी, खार येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी अधिक तपास केला असता कारमध्ये यज्ञेश वाघेला, रज्जोनली शेख, प्रवीणकुमार सिंग होते. आपत्ती व्यवस्थापन टीमने मृतदेह कारच्या बाहेर काढून कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले.