समुद्रकिनारी फिरायला आलेल्या मुलीला दमदाटी करत लैंगिक शोषण करण्याचा डाव फसला; मुलीच्या हुशारीमुळे तोतया पोलिस अडकला पोलिसांच्या जाळ्यात

गुहागर : समुद्रकिनारी फिरायला आलेल्या अल्पवयीन मुलीला पोलिस असल्याचे सांगत दमदाटी केली. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण करण्याचा डाव मुलीच्या हुशारीमुळे फसला. याप्रकरणी उमेश शिगवण (वय 26, रा. निगुंडळ) याला पोलिसांनी अटक केली आहे. यातील मुलीने हुशारी दाखवत त्या तोतया पोलिसाचा मोबाईल क्रमांक घेतल्यामुळे पोलिसांनी त्याला शोधून अटक केली आहे.
मंगळवारी (दि. 4) रोजी दुपारी मित्रासोबत ही अल्पवयील मुलगी फिरायला आली होती. यावेळी उमेश शिगवण याने पोलिस असल्याची बतावणी करत “तू माझ्यासोबत पोलिस ठाण्यात चल” असे सांगत उमेश तिला पोलिस ठाण्याच्या मागे असलेल्या समुद्रकिनार्‍यावर घेऊन आला. तिथे आल्यावर गुहागरचे पोलिस कडक आहेत ते तुला तुरुंगात टाकतील. त्यापेक्षा आपण शृंगारतळीच्या पोलिस ठाण्यात जाऊ या. तिथले पोलिस चौकशी करून तुला घरी सोडतील. असे उमेशने मुलीला सांगितले आणि तिला रिक्षात बसवून शृंगारतळीकडेे निघाला. पाटपन्हाळे कॉलेजजवळ आल्यावर उमेशने  “आता माझी ड्युटी संपत आहे. पुढची ड्युटी करणारा पोलिस इथे राहातो. त्याच्याकडे आपण जाऊ. त्यानंतर तुला आम्ही सोडून देऊ. असे सांगून पाटपन्हाळे कॉलेज परिसरातील निर्जन जंगल भागात उमेश तिला घेऊन गेला.
तिथे गेल्यावर तुला सोडण्यासाठी तुला मला काय देशील? असे विचारात उमेशने मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. आपल्याबाबतीत काहीतरी चुकीचे घडत आहे हे लक्षात आल्यावर मुलीने तिथून उमेशचा मोबाईल नंबर मिळवत पळ काढला आणि ती गुहागर शृंगारतळी या रहदारीच्या रस्त्यावर आली. यानंतर उमेशनेही तेथून पळ काढला.
ही मुलगी घरी उशिरा पोहोचली म्हणून पालकांनी चौकशी केली. ऐकलेल्या घटनेनंतर पालकांनी गुहागर पोलिस ठाण्यात दूरध्वनीद्वारे माहिती घेतली. प्रभारी पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी याची चौकशी सुरु केली.  पालकांनी तक्रार केल्यानंतर चार पोलिसांचे पथक  उमेश शिगवणच्या मागावर गेले. दसर्‍याच्या दिवशी (दि. 5) दिवसभर उमेश घरी गेलाच नव्हता. शोध सुरु असताना गुरुवारी (दि. 6) सायंकाळी पोलिसांनी त्याला एका मंदिरात पकडले. पोलिसी हिसका दाखवताच उमेश शिगवणने कबुली दिली. उमेश शिगवण याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button