
एकाच सत्रात तीन ऑगस्टला परीक्षा घ्या;’नीट-पीजी’बाबत सर्वोच्च न्यायालयाचे ‘राष्ट्रीय परीक्षा मंडळा’स निर्देश
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची ‘नीट-पीजी’ परीक्षा तीन ऑगस्ट रोजी एकाच सत्रात घेतली जावी,’ असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाला (एनबीई) दिले आहेत.ही परीक्षा ऑगस्टच्या सुरुवातीला घेण्याची मुभा दिली जावी, असे ‘एनबीई’ कडून न्यायालयास सांगण्यात आले होते. यावर इतका विलंब कशासाठी लावला जात आहे? असा सवाल न्या. पी. के. मिश्रा, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. संजय करोल यांच्या खंडपीठाने उपस्थित केला.
अतिरिक्त परीक्षा केंद्रांची निर्मिती करणे, सुरक्षा रक्षकांची तैनाती, तांत्रिक व्यवस्था आदी मुद्द्यांमुळे वेळ लागणार असल्याचा युक्तिवाद ‘एनबीई’कडून करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने परीक्षा घेण्यासाठी तुम्हीच विलंब करत आहात त्यामुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण येत असल्याची टिपणी खंडपीठाने केली.
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार नीट-पीजी परीक्षा १५ जून रोजी होणार होती. तथापि आता ती ३ ऑगस्ट रोजी एकाच सत्रात घेतली जाईल. दोन सत्रांत परीक्षा घेण्यास परवानगी देण्याची ‘एनबीई’ची विनंती याचिका मागील सुनावणीवेळी न्यायालयाने फेटाळून लावली होती.