
१८ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या वडिलांचेही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. १८ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या वडिलांचेही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.या घटनेमुळे संभया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
क्रिश संभया (१८, रा. सालईवाडा, सावंतवाडी) हा तरुण मंगळवारी २ जून रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास कारीवडे येथील नदीपात्रात फिरायला गेला होता. यावेळी पाय घसरून तो नदीत पडला आणि पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर बाबल आल्मेडा रेस्क्यू टीमच्या सहाय्याने त्याला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र अखेर रात्री उशिरा त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
क्रिशच्या निधनाची बातमी त्याचे वडील सेव्हिओ संभया (४८) यांना समजताच त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. क्रिश हा त्यांचा अत्यंत लाडका मुलगा होता आणि त्याच्या अचानक जाण्याने त्यांना अतिशय दुःख झाले. याच धक्क्याने आज बुधवारी सकाळी त्यांना हृदयाचा तीव्र झटका आला. सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश प्रभू यांनी त्यांना सकाळी सहा वाजता तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
परंतु, उपचारादरम्यानच दुपारी १२ वाजता त्यांचे रुग्णालयात निधन झाले.