
पदाधिकारी व संचालकांमुळे रत्नागिरी जिल्हा बँक राज्यात दोन नंबरवर : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
देवरूख : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक राज्यात दोन नंबरवर कार्यरत आहे. येथील पदाधिकारी व संचालक यांच्या उत्तम कामाचेच हे फलित असल्याचा गौरवोद्गार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी देवरूख येथे काढले. जिल्हा बँकेच्या देवरूख शाखेचा स्वमालकीच्या जागेत स्थलांतर व उद्घाटन सोहळा नामदार पाटील यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना बोलत होते. यावेळी संचालकांनी केलेल्या बैठक भत्ता वाढीच्या मागणीसाठी बोलताना याबाबत आयुक्तांशी चर्चा करून यावर योग्य निर्णय घेतला जाईल असे नमूद केले. कोकणचा निसर्ग सुंदर आहे. याचप्रमाणे येथील सहकार देखील चांगला असल्याने जिल्हा बँक राज्यात लवकरच अव्वल स्थान गाठेल, असा विश्वास व्यक्त करून बँकेच्या कारभाराबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष तानाजी चोरगे यांनी बँक चालवताना संचालक व कर्मचारी तसेच ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद यामुळेच चांगले काम उभे रहात असल्याचे सांगितले. सहकार कोकणात रुजवताना येणाऱ्या विविध समस्या चोरगे यांनी सहकार मंत्र्यांसमोर मांडल्या. तालुका स्तरावरील सर्वच शाखा स्वमालकीच्या जागेत आहेत. लवकरच ग्रामीण भागातील शाखीही मालकीच्या जागेत आणल्या जाणार असल्याचे नमूद केले. यावेळी बँकेचे संचालक व आमदार शेखर निकम यांनी बँकेची भरारी ही चोरगे यांच्या कडक शिस्त व उत्कृष्ट कार्यप्रणालीमुळे वाढत आहे. बँक सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. चिपळूण येथील पूर, धरणफुटी व कोरोनाकाळात पुढाकार घेऊन काम केले असल्याचे सांगितले. याप्रसंगी बॅक उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनीही बँकेच्या कार्याची गाथा वाचली. प्रास्ताविक संचालक राजेंद्र सुर्वे यांनी करताना कार्याचा अहवाल मांडला. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. मराठा भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला तालुक्यातील संचालक सौ. नेहा माने, रोहन बने, संतोष थेराडे, सुरेश बने, जिल्हा निबंधक सोपान शिंदे आदी मान्यवर व ग्राहक तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.