
करूळ घाटात कंटेनर अडकल्यामुळे मंगळवारी मध्यरात्री काही काळ वाहतूक ठप्प
करूळ घाटातील यू आकाराच्या वळणावर अवजड कंटेनर अडकल्यामुळे मंगळवारी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घाटात दोन्हीही बाजूने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर जेसीबीच्या सहायाने ट्रक बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु झालीहा प्रकार मंगळवारी रात्री 10.45 वा. च्या सुमारास घडला. सुदैवाने ट्रक दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावला.
गगनबावड्यापासून सुमारे 1 किमी अंतरावर करूळ घाटात पहिल्याच यू आकाराच्या वळणावर कोल्हापूरहून वैभववाडीकडे येणारा कंटेनर वळणाचा अंदाज न आल्यामुळे वळणात अडकून पडला. कंटेनर आणखी पुढे गेला असता तर खोल दरीत कोसळून मोठा अपघात झाला असता. ट्रक रस्त्यात मधेच अडकून पडल्यामुळे रस्ता बंद झाला. फक्त मोटार सायकल व छोटी वाहने जातील एवढा रस्ता मोकळा होता. तर सर्व मोठी वाहने यामध्ये ट्रक,टेम्पो, एस टी बस, खाजगी बस घाटात अडकून पडली होती. मध्यरात्री रात्री 1 वा. जेसीबीच्या मदतीने हा ट्रक रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरु करण्यात आली