
नाशिकमधील शिवसेना (ठाकरे) नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर शिवसेनेने (ठाकरे) मोठी कारवाई केली
नाशिकमधील शिवसेना (ठाकरे) नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर शिवसेनेने (ठाकरे) मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेने (ठाकरे) त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.नाशिकमधील शिवसेना नेत्यांनी पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती दिली आहे. दरम्यान, या हकालपट्टीबाबत बडगुजर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “पक्षातंर्गत बाबींवर नाराजी व्यक्त करणं हा गुन्हा नाही. तरीदेखील पक्षाला अशी कारवाई करायची असेल तर त्यावर काय बोलणार?
सुधाकर बडगुजर म्हणाले, “पक्षाने माझ्याशी कुठलीही चर्चा केली नाही. मी सध्या नाशिक शहराबाहेर आहे. आज नाशिक शिवसेनेची (ठाकरे) पत्रकार परिषद होती. मात्र, माझा नियोजित दौरा असल्यामुळे मी त्या पत्रकार परिषदेला हजर राहू शकलो नाही. मी जिल्हाध्यक्षांना त्याची पूर्वकल्पना दिली होती. पक्षांतर्गत बाबींवर नाराजी व्यक्त करणं, मुख्यमंत्र्यांना भेटण्यावरून अशी कारवाई करणं चुकीचं आहे. कोणाला पक्षात ठेवायचं आणि कोणाला नाही हे पक्ष ठरवतो, पक्षप्रमुख त्याबाबतचा निर्णय घेतात. यावेळी त्यांनी पक्षाने केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली”.
सुधाकर बडगुजर नेमकं काय म्हणाले?
बडगुजर यांना यावेळी विचारण्यात आलं की तुमची पुढची भूमिका काय? यावर ते म्हणाले, “वेळ आल्यावर सांगेन. पक्षातून हकालपट्टी होण्याबाबत मला कुठलीही कुणकुण लागली नव्हती. मात्र, मी पक्षांतर्गत बाबींवर नाराजी व्यक्त केली होती. तो गुन्हा असेल तर पक्षप्रमुखांनी तसं सांगावं. हकालपट्टी करण्यापूर्वी मला माझी बाजू मांडण्याची संधी दिली असती तर मी पक्षप्रमुखांना भेटलो असतो. हकालपट्टीनंतर त्यावर काही पर्याय राहिलेला नाही”.
सुधाकर बडगुजर म्हणाले, “पक्षात माझ्यासह खूप जण नाराज आहेत. त्यांच्यापैकी मी माझं मत जाहीरपणे व्यक्त केलं. इतरही अनेक जण नाराज आहेत. त्यांनी देखील वेळोवेळी चर्चा केली होती. मी त्यांची नावं जाहीर करणार नाही. आम्ही सर्व गोष्टी संजय राऊत यांच्या कानावर घातल्या होत्या. मात्र, अचानक माझ्या हकालपट्टीचा निर्णय झाला आहे. हा एकतर्फी निर्णय आहे. न्यायालय देखील दोन बाजू ऐकून घेतं”.