
चिपळूण-कराड रेल्वे प्रकल्प मार्गी लावावा, शौकत मुकादम यांची मागणी
शासनाच्या अनास्थेमुळे रखडलेला आणि कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्वाच्या चिपळूण-कराड रेल्वे प्रकल्पाकडे विशेष लक्ष देऊन तो मार्गी लावावा, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्याकडे केली आहे. या वेळी त्यांनी निवेदनाव्दारे कोकण रेल्वेबाबतचे अनेक प्रश्नही मांडले.
भाजपचे नेते, खासदार नारायण राणे शनिवारी चिपळूण दौर्यावर आले होते. या वेळी त्यांची भेट घेत शौकतभाई मुकादम यांनी त्यांना निवेदन दिले. श्री. मुकादम गेले अनेक दिवस चिपळूण-कराड रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी खा. राणे यांनाही निवेदन दिले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या जाहीरनाम्यात चिपळूण-कराड रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याची आठवण श्री. मुकादम यांनी करून दिली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूण-कराड रेल्वेचे भूमिपूजन केले होते; मात्र हा प्रकल्प अनेक वर्षे गुंडाळून ठेवण्यात आला आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यास कोकण रेल्वे व मध्य रेल्वे जोडली जाईल. त्यामुळे प्रवासी रेल्वे गाड्या वाढतील. शिवाय आपत्कालीन परिस्थितीत हा मार्ग सोयीचा ठरेल, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.