मुंबईतील नाल्यांमध्ये गाळ अद्यापही जैसे थे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आरोप !


मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतलेली नालेसफाईची कामे पावसामुळे थंडावली होती. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नालेसफाईच्या कामे वेगाने केली जात आहेत. मात्र, अनेक नाले, गटारांमध्ये गाळ आढळत असल्यामुळे नालेसफाईबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

आता राष्ट्रावादी युवक काँग्रेसने देखील नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पालिकेचे नालेसफाईचे आकडे फसवे असून अद्यापही मुंबईतील नाल्यांमध्ये गाळ जैसे थे असल्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे.

दरवर्षी पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून महानगरपालिकेतर्फे नालेसफाई केली जाते. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ८० टक्के गाळ पावसाळ्यापूर्वी, तर १० टक्के गाळ पावसाळ्यादरम्यान काढला जातो. तसेच पावसाळ्यानंतर १० टक्के गाळ काढला जातो. यंदा पहिल्या मोसमी पावसातच मुंबईतील अनेक भागात पाणी तुंबले. त्यांनतर पालिकेवर सर्व बाजूंनी टीका केली गेली. त्यानंतर सुरू झालेल्या आरोप – प्रत्यारोपांचे सत्र अद्यापही सुरूच आहे.

या वर्षी महापालिकेने ९.७९.७४२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी ८० टक्के गाळ ३१ मेपर्यंत, तर उर्वरित २० टक्के गाळ पावसाळ्यात काढण्यात येणार होता. मात्र, प्रत्यक्षात ही कामे विहित वेळेत पूर्ण झालेली नाहीत. अनेक नाल्यांमध्ये गाळ जैसे थे आहे. त्यामुळे पालिकेचे नालेसफाईचे दावे फोल ठरले आहेत. महानगरपालिकेने मुंबईकरांची फसवणूक केली आहे, असा दावा मातेले यांनी सोमवारी केला. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांमध्ये साटेलोटे असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

महापालिका गाळ काढल्याचे मोठे आकडे जाहीर करते, पण कोणत्याही विभागात प्रत्यक्ष स्थिती तपासताच नाल्यांमध्ये गाळ दिसून येतो. मुंबईत नालेसफाईचे बनावट आकडे, फुगवलेली बिले, आणि टक्केवारीचा खेळ सुरू असून मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

नालेसफाई प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी. प्रत्येक प्रभागातील नालेसफाई कामांच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी नागरी समित्या स्थापन कराव्यात. फसवे आकडे सादर करणारे अधिकारी आणि कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. संपूर्ण तपशील पालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावा, अशी मागणी राष्ट्रावादी युवक काँग्रेसने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button