
दोन दुचाकीची समोरासमोर धडक एक दुचाकीस्वार ट्रक खाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू
कराड -चिपळूण मार्गावरील खेर्डी येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातावेळी त्याचक्षणी जाणाऱ्या १२ टायर ट्रकच्या चाकाखाली आलेला एक दुचाकीस्वार तरुण गंभीररित्या जखमी झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.जखमी दुचाकीस्वारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. यात अन्य दुचाकीस्वारासह दोघेजण जखमी झाले आहेत. या अपघात प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात नोंद केली आहे. समीर चंद्रकांत चिवेलकर (३३, खेर्डी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. तसेच साईराज सावंत, सुनिल पवार अशी जखमी झालेल्याची नावे आहेत.
समीर चिवेलकर हा त्याच्या ताब्यातील दुचाकीने शहरातील बहाद्दुरशेख नाक्याहून खेर्डी येथे तर साईराज सावंत व सुनिल पवार हे दोघे दुचाकीने बहाद्दुरशेख नाक्याच्या दिशेने जात होते. तसेच बहाद्दुरशेख नाक्याहून पुढे खेर्डीमार्गे बेळगावच्या दिशेने मालवाहू १२ टायर ट्रक जात होता. असे असताना या दोन्ही दुचाकी खेर्डी येथे आल्या असताना त्याची समोरासमोर धडक बसली. या अपघातावेळी दुचाकीवरुन कोसळलेल्या समीरचा त्याचक्षणी जाणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आला. यात तो गंभीररित्या जखमी झाला. अखेर त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.