
दाभोळमधून लग्नाला जाणाऱ्या क्रुझरचा गुहागर-चिपळूण मार्गावर अपघात; आठजण जखमी
दाभोळवरून चिपळूण येथे लग्नाला जाणाऱ्या क्रुझरचा २ जून रोजी रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास गुहागर-चिपळूण मार्गावर देवघर या ठिकाणी अपघात झाला. गुहागर-विजापूर महामार्गालगत देवघर-मार्गताम्हाणेदरम्यान हा अपघात झाला असून क्रुझरमध्ये असलेले सर्व प्रवासी दाभोळचे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली उतरून झाडावर आदळली. ही गाडी बुरोंडी (दापोली) येथील असल्याची माहिती मिळाली आहे. या क्रुझरमध्ये एकूण १५ प्रवासी होते. त्यातील ७ ते ८ जण जखमी झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या सर्वांना तात्काळ डेरवण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यातील किरकोळ जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले असून, दोन ते तीनजणांवर अजून चार सुरू आहेत.
या अपघाताची नोंद सावर्डे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.