पुण्यात दारुड्या चालकाने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर बोळा फिरविला,एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना एका कार चालकाने उडवल्याची घटना, विद्यार्थी जखमी


पुणे शहरातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूल जवळ चहा प्यायला आलेल्या एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना एका कार चालकाने उडवल्याची घटना घडली. हा कार चालक दारू पिऊन कार चालवत होता हे समोर आलं आहे.दारू पिऊन कार चालवणाऱ्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यातील जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.

शनिवारी संध्याकाळी पुण्यातील भावे हायस्कूलजवळ ही घटना घडली. चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी आलेल्या 12 विद्यार्थ्यांना एका भरधाव वेगाने आलेल्या कारने उडवलं. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. तर नऊ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर संचेती आणि मोडक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या ड्रायव्हरने दारू प्यायल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जखमींमध्ये काही विद्यार्थी हे रविवारी होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेला सामोरे जाणार होते.पुण्यातील भावे हायस्कूलचा परिसर म्हणजे अरुंद रस्ते आणि छोटी गल्ली असलेला परिसर. असं असतानाही कार चालक भरधाव वेगाने आला. त्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटलं आणि समोर चहा पित असलेल्या विद्यार्थ्यांना त्याने उडवलं. जखमींमध्ये तीन मुलीही असल्याची माहिती आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक आमदार हेमंत रासणे उपस्थित राहिले. हेमंत रासणे यांनी मुख्यमंत्र्यांना या घटनेची माहिती दिली. या सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्यात यावेत असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. यांचा जो काही खर्च असेल तो शासन करणार आहे.या अपघातात जखमी झालेले काही विद्यार्थी हे रविवारी होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. पण त्यांची सध्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसंदर्भात काही वेगळा मार्ग निघू शकतो का यावरही विचार करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. युवा सेनेच्या नेत्या शर्मिला येवले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणला. या विद्यार्थांना जी काही मदत लागेत ती करू असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button