
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गतफळबाग व बांबू लागवडीसाठी अर्ज करावेत
*रत्नागिरी, दि.६ :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कृषी विभागामार्फत आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, कोकम, चिकू इत्यादी फळपिकांची तसेच बांबू लागवड करता येते. यासाठी १०० टक्के अनुदान उपलब्ध आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी सहायक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
जिल्ह्यातील हवामान फळबाग व बांबू लागवडीसाठी पोषक व अनुकूल आहे. शेतीमधून शाश्वत स्वरूपाचे उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी बांधवानी फळबाग लागवडीकडे वळणे आवश्यक आहे. जून व जुलै महिना हा फळबाग लागवडीसाठी योग्य कालावधी आहे. जून मध्ये लागवड केलेल्या कलमांची वाढ जोमदार होते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी जून महिन्यामध्ये फळपिकाची व बांबूची लागवड करण्याचा प्रयत्न करावा. फळबाग लागवड करताना शक्यतो सीआरए तंत्रज्ञानाचा वापर करावा. सीआरए तंत्रज्ञानाबाबत संबंधित गावातील सहाय्यक कृषी अधिकारी मार्गदर्शन करतील.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत शेतकरी बांधवांना ५ गुंठे ते २ हेक्टर क्षेत्रापर्यंत फळबाग लागवड करता येते. यामध्ये प्रथम वर्षी ५० टक्के द्वितीय वर्षी ३० टक्के व तृतीय वर्षी २० टक्के याप्रमाणे अनुदान वितरीत केले जाते. अल्पभूधारक म्हणजे २ हेक्टर व त्यापेक्षा कमी जमीनधारणा असलेले शेतकरी लाभ घेऊ शकतात. अनूसुचित जाती व अनूसुचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना जमीनधारणेची अट नाही. इच्छुक शेतकरी बांधवांकडे रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
*आवश्यक कागदपत्रे-* अर्ज व त्यासोबत सातबारा उतारा, ८ अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, जॉब कार्ड, संमतीपत्र, ग्रामसभा ठराव इत्यादी कागदपत्रे ग्रामस्तरीय सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावेत.
फळपिके व अनुदान देय रक्कम- आंबा फळपिकासाठी (10X10) मीटर अनुदान देय रक्कम २ लाख ५ पाच हजार ५१२ रुपये, आंबा (5X5) मीटर अनुदान देय रक्कम २ लाख ६५ हजार ८५० रुपये, काजू १ लाख ४४ हजार ३२ रुपये, नारळ रोपे (बाणवली) १ लाख ६७ हजार ८६६ रुपये, सुपारी २ लाख ६३ हजार ७४० रुपये, बांबू ७ लाख ४ हजार ४४६ रुपये.