राजाराम चव्हाण संगमेश्वर पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक; कायदा व सुव्यवस्थेसाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे – पो.नि. चव्हाण

संगमेश्वर / – संगमेश्वर पोलीस ठाण्याचा कारभार पोलीस उप अधिक्षक शिवप्रसाद पारवे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. या तीन महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी कामाच्या शैलीतून तालुक्यात चांगला दबदबा निर्माण केला होता. त्यांचा तीन महिन्याचा प्रशिक्षण कालावधी संपल्याने त्यांची बदली काही दिवसांपूर्वी रत्नागिरी येथे जिल्ह्याच्या ठिकाणी झाल्याने येथील ठाण्याचे पोलीस निरीक्षक पद हे 12 मे 2025 पासून रिक्त होते.या ठिकाणी राजाराम एम. चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी मंगळवारी संगमेश्वर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षकपदाचा कार्यभार हाती घेतला.

राजापूर पोलीस ठाणे येथून त्यांची बदली झाली असून गेली दीड वर्ष त्यांनी राजापूर तालुक्यात काम करताना अगदी शहरापासून गावगल्ली पर्यंत सुरु असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई करत आपला वचक निर्माण केला होता. पोलीस खात्यात त्यांच्या 29 वर्षाचा अनुभव असल्याने ज्या-ज्या ठिकाणी त्यांनी सेवा बजावली आहे त्या ठिकाणी अवैध धंद्याना लगाम घालणे, गुन्हेगारी वृत्तीला मोडीत काढणे, प्रलंबीत प्रकरणे मार्गी लावणे तसेच नवीन गुन्ह्यांचा उलगडा लावणे याला प्राधान्य देणे हे त्यांचे कर्तव्य असल्याने त्यांचा आपल्या कामाच्या ठिकाणी चांगलाच दरारा होता.पोलीस निरीक्षक राजाराम एम. चव्हाण यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील असून 2006 साली ते पोलीस उपनिरीक्षक म्हणुन पोलीस खात्यात रुजू झाले. मुंबई येथून त्यांनी पोलीस सेवेला सुरुवात करताना त्यांनी मुंबई मुख्यालय, पुणे, जालगांव, सांगली, सिंधुदुर्ग या ठिकाणी पोलीस उप निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच नौदल सेनेमध्येही त्यांनी सेवा बजावली असून 2019 साली त्यांची पोलीस निरीक्षकपदी बढती होऊन मुबंई येथे सेवा केली.

तेथून सिंधुदुर्ग व नंतर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर पोलीस ठाण्याचा कारभार गेले दीड वर्ष सांभाळला. आता त्यांची संगमेश्वर पोलीस ठाण्यात बदली झाली असून येथील ठाण्याचा कारभार त्यांनी आपल्या हाती घेतला आहे.नूतन पोलीस निरीक्षक यांची संगमेश्वर व कार्यक्षेत्रतील प्रतिष्ठित, सामाजिक, राजकीय, आदींनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना बुके देऊन स्वागत केले. सहकारी पोलीस तसेच जनतेचे सहकार्य आणि त्यांना विश्वासात घेऊन पारदर्शक कार्य करणार असल्याचे सांगताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन नूतन पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यानी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button