जलकुंडानं साठवलं पाणी, शेती पिकणार सोन्यावाणी’२५ गुंठ्यात एक ; ५२ हजार लिटरचा साठा ; शेतकऱ्यांसाठी वरदान योजना


कोकणात सर्वाधिक पाऊस पडत असला तरी, ऑक्टोबरपासून पावसाचे प्रमाण कमी होते. कातळ जमीन आणि छोट्या जमिनीच्या तुकड्यांमुळे शेतकऱ्यांना संरक्षित पाण्याचा लाभ मिळावा, या उद्देशाने पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकाराने कृषी विभागाने राबविलेली ‘कोकण जलकुंड’ योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. कोकण म्हणजे पाऊस, आंबा-काजूच्या बागांचा सुगंध आणि लाली ल्यालेल्या जमिनीचा मृदगंध. पण, या पावसाळी प्रदेशातही जानेवारीनंतर पाण्याची कमतरता भासते. कातळ जमिनीमुळे मोठी शेततळे बांधणे अशक्य होते. अशा परिस्थितीत ‘कोकण जलकुंड’ ही योजना म्हणजे आशेचा नवा झरा ठरली आहे.


चिपळूण तालुक्यातील ढोक्रवली येथील युवा शेतकरी राजेंद्र धाकटू गावकर या योजनेबद्दल सांगतात,
“माझे वडील धाकटू रत्ना गावकर यांच्या नावे असलेली शेती मी करतो. २०२४-२५ या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेत मला ‘कोकण जलकुंड’ मंजूर झाले. आता पावसाने ते तुडुंब भरले आहे. पूर्वी दीड-दोन किलोमीटरवरून पाण्याचे पिंप मोटरसायकलीवरुन वाहून आणावे लागे, पण आता शेतातच पाणी साठवले गेले आहे. माझ्या काजू बागेला जीवन मिळाले आहे. कृषी विभागाच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे.”


तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे सांगतात,
“कोकणात पाऊस मुबलक पडतो, पण जानेवारीपासून पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. जलकुंडांमुळे आता ५२ हजार लिटरपर्यंत संरक्षित पाणी उपलब्ध होत आहे. या साठ्याचा सिंचन आणि फवारणीसाठी मोठा उपयोग होत असून, शेतकऱ्यांना थेट फायदा मिळतो आहे. चिपळूण तालुक्यात आतापर्यंत ६० जलकुंड पूर्ण झाली असून, सुमारे १० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.”
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले म्हणाले,
“पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जलकुंडांच्या माध्यमातून फायदा मिळाला आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेमधून ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. प्रत्येकी ५ मीटर लांब, ५ मीटर रुंद आणि २ मीटर खोल अशा या जलकुंडांत ५२ हजार लिटर पाणी साठते. २५ गुंठ्याला एक या प्रमाणे प्रती हेक्टर चार जलकुंड देता येतात. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी टिकून राहणार असून, त्यांच्या आयुष्यातील समृद्धीचा प्रवाह अखंड वाहत राहील.”
‘कोकण जलकुंड’ या योजनेमुळे कोकणातील प्रत्येक शेतात आता पाण्याचा खजिना साठला आहे.
निसर्गाचा आशीर्वाद आणि कृषी विभागाचा प्रयत्न यांची सांगड घालून “जलकुंडाने साठवले पाणी, शेती पिकणार सोन्यावाणी!” हे वाक्य आज अक्षरशः खरे ठरत आहे.
✍️ प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button