
आरे वारे पॉईंट येथे पर्यटकांची उभी करून ठेवलेली कार खाली समुद्रात कोसळली
रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावरील प्रसिद्ध आरे – वारे पॉईंट येथे बुधवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली पर्यटकांची उभी करून ठेवलेली कार दीडशे फूट खाली पडली मात्र या गाडीतील पर्यटक फोटो काढण्यासाठी बाहेर आले होते त्यामुळे ते बचावले यात कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे
बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सांगली येथील दोन पर्यटक पावसाळी पर्यटनाच्या निमित्ताने रत्नागिरीत दाखल झाले होते. आरे – वारे येथील पॉईंट नजीक आल्यानंतर या पर्यटकांना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. गाडी समुद्राच्या दिशेने पार्क केल्यानंतर या दोघा पर्यटकांनी फोटो काढण्यास सुरुवात केली. मात्र याचवेळी गाडी अचानक समुद्राच्या बाजूने जाऊ लागली अन् क्षणार्धात आरे वारे पॉईंट वरून थेट शंभर ते दीडशे फूट खोल खाली कोसळली.गाडी समुद्रात कोसळताच जमलेल्या पर्यटकांनी एकच गोंधळ सुरू केला. या दुर्घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी येथील पोलीस पाटील आदेश कदम यांना दिली. शंभर ते दीडशे फूट खोल खाली कोसळलेली चारचाकी गाडी बाहेर काढण्यासाठी क्रेन ची मदत मागवण्यात आली. स्थानिकांच्या सहकार्याने सायंकाळी उशिरा क्रेनच्या मदतीने कोसळलेली कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.