
आंबिया बहारमध्ये सहभागी होण्याकररिता अॕग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र बंधनकारक.
रत्नागिरी, दि. 29 :- पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2025-26 मध्ये योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांना अॕग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक केला आहे. ज्या आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे, अशा शेतक-यांनी योजनेचा लाभ मिळण्याकरिता अॕग्रिस्टॅक अंतर्गत नोंदणी पूर्ण करून आपला शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) 31 मे 2025 अखेर तात्काळ काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना १२ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत आंबिया बहार सन 2025-26 मध्ये आंबा व काजू या फळपिकांसाठी राबविण्यात येत आहे. कृषी विभागाच्या शासन निर्णय 11 एप्रिल 2025 नुसार व 15 मे 2025 रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीमध्ये दिलेल्या सूचनान्वये कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभाकरीता शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) 15 एप्रिल 2025 पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. नोंदणी करण्यासाठी mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार आहे. तसेच महा ई सेवा केंद्र आणि कृषी विभाग/महसूल विभाग/ग्रामविकास विभागातील अधिका /कर्मचारी यांचेमार्फत ग्रामस्तरावर नोंदणीचे काम सुरु असल्याने त्यांचेशी संपर्क करून नोदणी करावी.