
रत्नदुर्ग किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आढळली आणखी एक सतीची स्मृतीशिळ.
*रत्नागिरी : शहराजवळील रत्नदुर्ग किल्ला परिसरात वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास व संशोधन कार्य करताना करजुवे (ता. संगमेश्वर) येथील इतिहास संशोधक, विरगळ व सतीशिळा अभ्यासक, कोकण दुर्ग अभ्यासक स्नेहल सुभाष बने यांना १ मे २०२५, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच बांधाला जुनी सती स्मृतीशिळा दिसली. या स्मृतीशीळेची वास्तूरचना जांभा दगडातली आहे. त्यावर नवीन सिमेंटने डागडुजी केलेली आहे आणि वर त्रिकोणी शिखर दर्शविलेले आहे. स्मृतीशीळेच्या आतमध्ये पादुका दिसल्या. त्यांची लांबी १० सेमी व रुंदी ७ से.मी आहे. तसेच स्मृतीशीळेची उंची दोन ते अडीच फूट आहे.

सध्याच्या स्थितीत सिमेंटचा वापर करून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने स्मृतीशिळेची डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे पुरातन पादुकांच्या अवशेषाचे मूळ स्वरूप बदलले असून, पादुका थोडी खराब, जीर्ण झाली आहे. तरी देखील आजतागायत या दोन्ही पादुका जांभा दगडात कोरलेल्या असून देखील स्पष्ट दिसतात. आतमध्ये पाणी साठून राहू नये यासाठी शिळेला पाणी जाण्याचा मार्ग नव्याने करण्यात आला आहे. तसेच स्मृतीशिळे समोर ग्रामस्थांनी दिवा बत्तीची सोय केली आहे.या स्मृती शिळेचा इतिहास सर्वांसमोर येण्यासाठी अधिक संशोधन होणे गरजेचे आहे, असे मत वीरगळ व सतीशीळा अभ्यासक स्नेहल बने यांनी मांडले आहे आणि त्याप्रमाणे पुढे संशोधनाचे अधिक प्रयत्न चालू राहील, असे त्या म्हणाल्या.