
जिंदलविरोधात नंदिवडे ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाला ठाकरे सेनेचा जाहीर पाठिंबा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजल्यापासून आंदोलन करण्याचे आवाहन…
रत्नागिरी : तालुक्यातील नांदिवडे गावाच्या माथ्यावर जिंदल कंपनी गॅस टर्मिनल प्रकल्प उभारत आहे. आधीच जिंदल कंपनीच्या कोळशाची धूळ आणि राख यांनी सर्व शेतकरी व नागरिक आजारग्रस्त झाले आहेत. त्यामुळे हा प्रकल्प येथून हटवण्यासाठी ग्रामस्थांनी उद्या (२८ मे) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजल्यापासून आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला शिवसेना उद्धव जाहीर पक्षाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.लोकवस्तीमध्ये जिंदाल गॅस टर्मिनल उभारत असताना जनसुनावणी घेतली नाही. एक किलोमीटरच्या परिसरामध्ये सहा शाळा आहेत याचा देखील प्रशासनाने विचार केला नाही. ग्रामस्थांचे म्हणणे डावलून कंपनी येथे जिंदाल गॅस टर्मिनल उभारत आहे. दोन महिन्यांपूर्वी याच कंपनीच्या प्लांटमधून वायू गळती होऊन त्याचा त्रास जवळच असलेल्या शाळेतील मुलांना तसेच १० ते १५ किलोमीटर परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिलांना झाला होता. त्यामुळे भविष्यातील धोका लक्षात नांदिवडे गावातील ग्रामस्थ हा प्रकल्प येथून स्थलांतरित करण्यात यावा यासाठी गेले दोन महिने पाठपुरावा करत आहेत. मात्र कंपनी प्रशासनाकडून ग्रामस्थांचे म्हणणे दुर्लक्षित करून गॅस टर्मिनलची उभारणी केली जात आहे. त्यामुळे गावात उभारण्यात येत असलेले हे गॅस टर्मिनल स्थलांतर करण्यासाठी नांदिवडे गावातील ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उद्या (२८ मे) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजल्यापासून आंदोलन करणार आहेत.जिंदल गॅस टर्मिनल स्थलांतर करण्यासाठी पुकारलेल्या या आंदोलनाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत असून सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे व जनतेला न्याय मिळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ठाकरे शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी केले आहे.




