
स्रोत बळकटीकरण व शाश्वत करण्यामध्ये लोकांचा सहभाग महत्त्वाचा : पोलिस निरीक्षक नीलकंठ बगळे.
लांजा : “स्रोत बळकटीकरण व शाश्वत करण्यासाठी लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, हा शासनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. स्वयंपाक, शेती स्वच्छता तसेच पिण्यासाठी या आपल्या दैनंदिन गरजांसाठी पाणी येते. पाण्याचे स्रोत आपण दररोज वापरत असलेले आवश्यक पाणी पुरवतात. आरोग्य राखण्यासाठी, शेतीला आधार देण्यासाठी आणि उपजीविकेचे साधन टिकवण्यासाठी ते महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने आपले पाण्याचे स्रोत हे दूषित होणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे. तसेच त्याचे संवर्धन आपल्याला- आपल्या स्तरावर केले पाहिजे,” असे प्रतिपादन लांजा पोलिस ठाण्याचे निरीक्षक निळकंठ बगळे यांनी केले. जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत २३ व २४ मे रोजी दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षणाचे आयोजन येथील काळे-कुलकर्णी छात्रालय आणि लांजा पोलिस वसाहतीतील संकल्प सिद्धी सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रशिक्षणासाठी ग्रामपंचायतीमधील ग्राम पाणीपुरवठा स्वच्छता समितीमधील पदाधिकारी, इतर संवर्गातील कर्मचारी निमंत्रित होते. या प्रशिक्षणाला पंचायत समिती गटविकास अधिकारी संतोष मेहत्रे, लांजाचे पोलिस उपनिरीक्षक अमोल सरंगळे, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे भूगोल विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुरेंद्र ठाकूर देसाई तसेच मुख्य संसाधन केंद्रातील साधन व्यक्ती उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा सल्लागार कुमार शिंदे केले. मुख्य संशोधन केंद्राचे समन्वयक मंगेश नेवगे यांनी आभार मानले.




