
रत्नदुर्ग किल्ला परिसरात शरभ प्राण्याचे कोरीव अंकन असलेले वीर पुरुषाचे स्मृती स्मारक इतिहास संशोधक , कोकण दुर्ग अभ्यासक आणि वीरगळ व सती शिळा अभ्यासक स्नेहल बने यांचे आणखीन एक संशोधन.
१ मे महाराष्ट्र दिनाच्या रोजी रत्नदुर्ग किल्ल्यात काही वीर पुरुषांच्या स्मृतीशिळा व सतीच्यास्मृती शिळा सापडल्या त्यात दोन वीर पुरुषांच्या स्मृती स्मारक मिळाल्या. त्यातील एक महत्त्वाची वैशिष्टे पूर्ण लक्षवेधनारी वीरषुरुष स्मृतीस्मारक आहे. या स्मृतीस्मारकावर महिरपी कमानी आहे व कमानीच्या दोन्ही बाजूला पुष्प कोरलेली आहेत. स्मृती स्मारकाच्या आतमध्ये दिवाबत्ती करण्यासाठी छोटी खण कोकणी भाषेत साने यांची सोय केलेली आहे. ही शिळा साधारण तीन फूट उंच आहे व त्यामध्ये लिंग स्थापित केलेले आहे. तसेच या शिळेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यावर शरभ नावाच्या प्राण्याचे अंकन स्मारकाच्या मागच्या व डाव्या बाजूला कोरलेले आहे.

या वीर पुरुषांच्या स्मृतीस्मारकाचा इतिहास शोधला असता थोडी माहिती अवगत झाली. सन १५२६ च्या सुमारास बहामनी राज्याचे पाच भाग झाले. त्यावेळी होणारी लहान सहान बंडे मोडण्याकरता विजापूरच्या सुलतान युसुफ आदिलशहाच्या वतीने अनेक मराठा व मुसलमान सरदारांची नेमणूक झाली होती. त्यातच गुणवंतगड व दंतगिरी परगण्याची देशमुखी मिळवलेल्या चालुक्य राजकुलोत्पन्न सोरबाजी साळुंखे यांचे वंशज तुकोजीराव व रामराव या बंधूद्वयांची वर्तमान सातारा व कोकणपट्टीतील भागाच्या बंदोबस्ताकरिता मोकासेदार या नात्याने नेमणूक झाली. विजापूरच्या कल्याण सुभ्याहून तुकोजीराव आपले पुत्र प्रतापराव, हंबीरराव, जगपाळराव ,महाकाळ व बंधू रामराव यांचे समवेत ५००० फौजेसह स्वारीस निघाले. प्रथम ते सातारा प्रांती आले आणि त्यांनी पाटण परगणा सर केला.


या युद्धात त्यांचा तिसरा पुत्र जगपाळराव यास अतीशौर्यामुळे थकवा आला होता. सबब जिंकलेल्या भागाचे व्यवस्था पाहणेस त्यास फौजेसह तेथेच ठेवून तुकोजीराव आपले उर्वरित तीन पुत्र व बंधू रामराव यांचे सह कोकण प्रांताच्या बंदोबस्ताकरिता पुढे निघाले. नंतर संगमेश्वर तालुक्यातील धामधूम मोडून त्या भागातील बंदोबस्ताकरिता तुकोजीरावांनी आपला ज्येष्ठ पुत्र प्रतापराव यांस महिपतगडावर ठेवले व आपला मोर्चा रत्नागिरीकडे वळवला. त्यावेळी रत्नागिरी येथील किल्ल्यात अनंतसिंह नावाचा रजपूत किल्लेदार होता. बहामनी राज्याचा अव्यवस्थेचा फायदा घेऊन त्याने जलमार्गाने लुटालूट करणाऱ्या चाचे लोकांना सामील होऊन लहान सहानबंडे व लुटालूट करण्याचा उपक्रम चालविला होता. तेव्हा तुकोजीरावांनी आपला मोर्चा प्रथम रत्नागिरी किल्ल्याकडे वळविला आणि रत्नागिरी किल्ल्यावर अचानक छापा घातला.
या लढाईत तुकोजीराव यांचे बंधू रामराव यांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. अंबारीत बसलेल्या अनंतसिंहावर त्यांनी सिंहाप्रमाणे झडप घातली. परंतु अंबारीत बसलेल्या अनंतसिंहाच्या बाणाने अचूक वेध घेतला. रामराव पडले. आपले चुलते पडल्याचे कळताच तरुण रक्ताचे हंबीरराव त्वेशाने पेटून उठले आणि त्यांनी अनंतसिंहा बरोबर निकराची लढाई केली. पण त्यांनाही वीरगती प्राप्त झाली. अशाही परिस्थितीत तुकोजीरावांनी शांत चित्ताने युद्धनीती आखून अनंतसिंहाला चारही बाजूने घेरले आणि जेरबंद केले आणि विजापूरला बादशहाकडे रवाना केले. या लढाईत तुकोजीराव सावंतसाळुंखे यांनी अनंतसिंहाचा पूर्ण पराभव केला तेव्हा बादशहा खुस झाला आणि त्याने जिंकलेला भाग तुकोजीरावांच्या तैनातीला नेमून दिला. तद्नंतर तुकोजीरावांनी आपले लष्करी ठाणे झाडगांव येथे बांधून तेथून आपल्या वतनाचा कारभार सुरू केला. सध्या या भागाला चौकी असे म्हणतात. तद्नंतर तुकोजीरावांनी हा गाव वसविला आणि झाडगाव येथे आपली कुलस्वामिनी जोगेश्वरीची स्थापना केली व तिच्या देवालयासमोर आपल्या रणांगणी पतन पावलेल्या बंधूचे स्मारक म्हणून त्याची प्रतिमा कोरलेली ( हत्तीवर चढाई करून जाणारे रामराव )अशी लहानशी शिळा बसवली. याचे संदर्भ सावंत साळुंखे घराण्याची कैफियत व वंशावळ या पुस्तकात आहे.
तसेच लगतच अजून एक स्मृतीशिळातु आहे तिची नवीन रस्त्यालगत तटबंदी झाली असल्याकारणाने पडझड झाली आहे. त्यामुळे आत मध्ये अवशेष मोडीस गेले. परंतु शरभ प्राण्याचे आज तगायत ह्या ऐतिहासिक वास्तूवरचे अंकन जसेच्या तसेच कोरलेले पाहायला मिळतात. सदर दोन्ही स्मृतीशिळा या वैयक्तिक मालकी जागेत आहेत अशा दुर्मिळ व ऐतिहासिक ठेवा असलेल्या वास्तूंचे जतन व संवर्धन झाले पाहिजे आणि आपल्या पुढील पिढीला वीर पुरुषांच्या बलिदानाच्या पराक्रमाचा इतिहास माहिती झाला पाहिजे यासाठी यांचे जतन होणे गरजेचे आहे असे वीरगळ व सतीशिळा अभ्यासक स्नेहल बने यांचे म्हणणे आहे. सदर स्मृतीशिळेबाबत अधिक संशोधन होणे गरजेचे असल्याचेही स्नेहल बने यांनी सांगितले. त्याप्रमाणे पुढील अधिक शोधकार्याचे प्रयत्न सुरू राहणार.