
भारतीय खासदारांचे विमान उतरतेवेळी मॉस्को विमानतळावर ड्रोन हल्ला
पाकिस्तानी दहशतवाद्यांचा पर्दाफाश करण्यासाठी रशियाला पोहोचलेल्या भारतीय शिष्टमंडळाच्या विमानाला राजधानी मॉस्कोवरून प्रदक्षिणा घालावी लागली.कारण द्रमुक खासदार कनिमोझी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मॉस्कोमध्ये दाखल होताच, युक्रेनने ड्रोन हल्ला केला.युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्कोमधील सर्व विमानतळांवर विमानांची वाहतूक बंद करण्यात आली. रशियाच्या या निर्णयामुळे भारतीय प्रतिनिधी मंडळाचे विमान काही मिनिटे हवेत फिरू लागले. शेवटी, हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर विमान मॉस्कोमध्ये उतरवण्यात आले.विमान उतरल्यानंतर, सर्व खासदारांचे मॉस्कोमधील भारतीय राजदूत विनय कुमार यांनी स्वागत केले. सर्व खासदारांचे काम रशियन सरकार, वरिष्ठ खासदार, अधिकारी आणि तज्ञांना पाकिस्तानमध्ये वाढणाऱ्या दहशतवाद्यांची माहिती देणे आहे. कनिमोझी यांनी, “भारताचे रशियाशी आधीच उत्कृष्ट संबंध आहेत. पाकिस्तानचे दहशतवादी जगासाठी कसे धोका बनत आहेत हे आम्ही रशियाला सांगू” असे यावेळी म्हटले.